T20 World Cup 2024 PAK vs USA Live : अमेरिकेच्या गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पाकिस्तानच्या संघात ट्वेंटी-२० क्रिकेटमधील तगडे फलंदाज समोर असतानाही त्यांनी टिच्चून मारा केला. कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) व शादाब खान यांनी डाव सावरला नसता तर पाकिस्तानची अवस्था खूपच वाईट झाली असती. बाबरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील विराट कोहलीच्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडला, परंतु पाकिस्तानचा डाव ढेपाळला.
पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी
नवख्या अमेरिकेच्या संघासमोर पाकिस्तानची हवा निघाली. सौरभ नेत्रावळकरने दुसऱ्याच षटकात धक्का दिल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी रांग लावली आणि त्यांचे ३ फलंदाज २६ धावांवर माघारी परतले. अमेरिकन गोलंदाजांनी सुरेख मारा करताना पाकिस्तानला १० षटकांत ३ बाद ६६ धावांवर रोखले. मोहम्मद रिझवान ( ९), उस्मान खान ( ३) व फखर जमान ( ११) हे अपयशी ठरले. सौरभनंतर नोस्तुश केंजिगे व अली खान यांनी विकेट घेतल्या. त्यामुळे कर्णधार बाबर आजमनवर दडपण आलेले दिसले. पण, बाबर व शादाब खान यांनी पाकिस्तानचा गड सावरला. दोघांनी दमदार फटकेबाजी करून संघाचा रन रेट सुधारला. शादाब आक्रमक खेळ करताना दिसला, तर बाबरचा संयमी खेळ सुरू होता.
संथ खेळ करूनही आज बाबरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील मोठा विक्रम नावावर केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ४०६७ धावा बाबरने केल्या. त्याने
विराट कोहली ( ४०३८) व रोहित शर्मा ( ४०२६) यांचा विक्रम मोडला. बाबर व शादाब यांची ४८ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी १३व्या षटकात तुटली. केंजिगेने पाकिस्तानला चौथा धक्का दिला आणि शादाब २५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४० धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर आजम खान भोपळ्यावर पायचीत झाला आणि पाकिस्तानची अवस्था ५ बाद ९८ अशी झाली. केंजिगेने ४ षटकांत ३० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या.
अखेरच्या पाच षटकांत धावा वाढवण्याचे आव्हान बाबर व इफ्तिखार अहमद यांच्यावर होते आणि जसदीप सिंगने मोक्याच्या क्षणी धक्का दिला. बाबर ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांवर पायचीत झाला. नेत्रावळकरने १९व्या षटकात पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का देताना इफ्तिखारला ( १८) पायचीत केले. नेत्रावळकरने ४ षटकांत १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदीने २३ धावांची खेळी करून पाकिस्तानला ७ बाद १५९ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: T20 World Cup 2024 PAK vs USA Live Marathi : Babar Azam becomes the leading run scorer in T20i history, USA NEED 160 TO DEFEAT PAKISTAN
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.