T20 World Cup 2024 PAK vs USA Live : पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साजेशी सुरुवात करता आलेली नाही. नोस्तुश केंजिगेच्या फिरकीने अमेरिकेने डावाची सुरुवात केल्यानंतर जलदगती गोलंदाज सौरभ नेत्रावळकर ( Saurabh Nethravalkar ) दुसऱ्याच षटकात पाकिस्तानची विकेट घेतली. केंजिगेने त्याच्या पुढच्या षटकात अमेरिकेला दुसरे यश मिळवून देताना पाकिस्तानची अवस्था २ बाद १४ धावा अशी केली.
यजमान अमेरिकेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या पहिल्या सामन्यात कॅनडावर विजय मिळवला आणि आज पाकिस्तानविरुद्धही त्यांनी नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानही विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे, कारण पुढील सामन्यात त्यांना तगड्या टीम इंडियाचा सामना करायचा आहे.
९ जूनला होणाऱ्या लढतीपूर्वी पाकिस्तानसाठी हा सराव सामना असेल, परंतु यजमानांना हलक्यात घेणे त्यांना महागात पडू शकते. मोहम्मद रिझवानने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले. पण, दुसऱ्याच षटकात त्याला माघारी जावे लागले. सौरभ नेत्रावळकरच्या अप्रतिम चेंडूवर रिझवानच्या ( ९) बॅटची किनार घेत चेंडू स्लीपच्या दिशेने गेला आणि टेलरने वन हँडर स्टनिंग कॅच घेतला. पाकिस्तानला ९ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर आलेला उस्मान खान ( ३) केंजिगेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
मुंबईचा पोरगा सौरभ...भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळलेला
मुंबईचा क्रिकेटपटू सौरभ नेत्रावलकर अमेरिकेचे ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिनिधित्व करतोय. २०१० च्या १९वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असलेल्या सौरभने चमकदार कामगिरी केली होती. मुंबईच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने त्यावेळी वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. तीन वर्षांनंतर सौरभने मुंबईकडून कर्नाटक विरुद्ध रणजी सामना खेळला आणि तीन विकेट घेतल्या.
२०१५ मध्ये तो संगणक अभियंता होण्यासाठी अमेरिकेत गेला. सौरभने मुलाखतीत सांगितले होते की, 'मी माझी दोन वर्षे क्रिकेटला दिली आणि मनापासून खेळलो, पण मला माझ्या खेळाला पुढच्या स्तरावर नेणे शक्य झाले नाही, याची जाणीव झाली. यानंतर मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली. यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला.
अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना सौरभला पुन्हा क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तो अभ्यासासोबतच क्रिकेट खेळला आणि ओरॅकलमध्ये नोकरीला असूनही क्रिकेट खेळत राहिला. २७ वर्षीय नेत्रावलकर क्रिकेट खेळण्यासाठी दर आठवड्याला सॅन फ्रान्सिस्को ते लॉस एंजेलिस असा प्रवास करत असे.
Web Title: T20 World Cup 2024 PAK vs USA Live Marathi : Mohammad Rizwan departs for 9(8) - Saurabh Nethravalkar gets the first wicket for the USA, Stunning CATCH BY TAYLOR, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.