T20 World Cup 2024 : भारतात सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ही स्पर्धा संपताच जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाईल. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. बहुतांश संघांच्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत. ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. बाबर आझमला पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बाबर आझमने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, पाकिस्तान नक्कीच यंदाचा विश्वचषक जिंकेल असा मला विश्वास आहे. २०२१ आणि २०२२ मध्ये आम्ही अपेक्षित यश मिळवू शकलो नाही. पण, मला आशा आहे की, यावेळी आम्ही आमच्या कामगिरीने देशाची मान उंचावू. पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोहम्मद हारिसला संधी मिळाली. पण तो त्या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. तो एक चांगला खेळाडू आहे मात्र टॉप ऑर्डरमध्ये त्याच्यासाठी जागा नाही. मोहम्मद रिझवान, सैय अयुब, फखर झमान आणि मी डावाची सुरुवात करेन.
पाकिस्तानने आखली रणनीतीतसेच भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली हा एक वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. तो जागतिक पातळीवर सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आम्ही त्याच्याविरूद्ध रणनीती आखू आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंविरूद्धही प्लॅन करू. न्यूयॉर्कच्या नवीन खेळपट्टीवर विराट कोहलीसारख्या फलंदाजांना रोखण्यासाठी विशेष योजना आखण्याची गरज आहे, असेही बाबर आझमने सांगितले.
बाबर आझमने आणखी सांगितले की, हसन अली विश्वचषकाच्या १५ सदस्यीय संघाचा भाग नसेल. हारिस रौफच्या अनुभवाचा नक्कीच संघाला फायदा होईल. हारिस दुखापतीतून सावरत आहे. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० संघाचा एक प्रमुख घटक आहे. तर, गॅरी कस्टर्न पाकिस्तानच्या संघाचे प्रशिक्षक असतील यावर बाबरने शिक्कामोर्तब केला. खेळपट्टीबद्दलच्या प्रश्नावर मात्र बाबरने भारतीय कर्णधार रोहित शर्मासारखा पवित्रा घेत उत्तर देणे टाळले आणि पुढचे पुढे बघू असे उत्तर दिले.