Join us  

PNG vs UGA : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच विजय मिळाला; युगांडाच्या शिलेदारांनी भारी डान्स केला

PNG vs UGA Match : युगांडाने विश्वचषकात विजय मिळवताच खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 11:41 AM

Open in App

T20 World Cup 2024 PNG vs UGA : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच विजय मिळाल्यानंतर युगांडाच्या शिलेदारांनी जोरदार जल्लोष केला. त्यांनी डान्स करत विजयाचा आनंद साजरा केला. युगांडा आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात झालेला सामना रंगतदार ठरला. कमी धावसंख्या असलेला हा सामना प्रेक्षणीय ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीचा संघ अवघ्या ७७ धावांत गारद झाला.

युगांडा सहज विजय मिळवेल असे वाटत असताना त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. छोट्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना १८.१ षटके खेळावी लागली. अखेर युगांडाच्या फलंदाजांनी सावध खेळी करत विजय साकारला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करत असताना युगांडाचा निम्मा संघ अवघ्या २६ धावांत तंबूत परतला होता. मग रियाजत अली शाहने (३३) मोर्चा सांभाळला आणि सावध खेळी केली. 

अखेर युगांडाने १८.१ षटकांत ७ बाद ७८ धावा करून ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच विजय मिळवला. आव्हान छोटे होते पण रंगतदार झालेल्या या सामन्यात अखेर युगांडाला यश मिळाले. त्यांनी पापुआ न्यू गिनी संघाचा ३ गडी आणि १० चेंडू राखून पराभव केला. 

युगांडाचा विजय

७८ धावांच्या लहान आव्हानाचा बचाव करताना पापुआ न्यू गिनीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. युगांडा सामना सहज जिंकेल असे वाटत असताना त्यांनी संघर्ष करण्यास भाग पाडले. पापुआ न्यू गिनीकडून एलेई नाओ, नोर्मन वनुआ यांनी २-२ बळी घेतले, तर चॅड सोपर आणि कर्णधार असद वाला यांनी १-१ बळी घेऊन कडवी झुंज दिली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. १९.१ षटकांत संघ अवघ्या ७७ धावांवर गारद झाला. लेगा सिका (१२), हिरी हिरी (१५) आणि किप्लिन डोरीगा (१२) हे तीन फलंदाज वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. युगांडाच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. अल्पेश रमजनी, कॉस्मस कियवुटा, जुमा मियागी, फ्रँक एनएसबुगा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, कर्णधार ब्रायन मसाबाला एक बळी घेण्यात यश आले. युगांडाला विजयासाठी केवळ ७८ धावांची गरज होती पण त्यांना इथपर्यंत पोहोचताना खूप संघर्ष करावा लागला. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024सोशल व्हायरलआयसीसीऑफ द फिल्ड