Rahul Dravid On Rohit Shama : भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासह कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पदाचा कार्यकाळ देखील संपला आहे. लवकरच टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मिळेल. टीम इंडियासोबतच्या निरोप समारंभात बोलताना द्रविड यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. तेव्हाच द्रविड हे प्रशिक्षक म्हणून पदभार सोडणार होते. पण, कर्णधार रोहित शर्माचा एक फोन आणि द्रविड यांनी निर्णय बदलला, असे खुद्द द्रविड यांनी सांगितले.
राहुल द्रविड यांनी रोहित शर्माचे आभार मानले. ते म्हणाले की, रोहित शर्माने मला फोन केला म्हणूनच मी प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिलो. जर तो फोन आला नसता तर मी या विजयाचा हिस्सा नसतो. खरे तर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वन डे विश्वचषकानंतर संपला होता. भारताने सलग १० सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.
तसेच टीम इंडियासोबत काम करता आले याचा खूप आनंद आहे. पण, रो (रोहित शर्मा) तेव्हा मला थांबवण्यासाठी धन्यवाद. आमच्याकडे चर्चा करण्यासाठी खूप वेळ आहे, आम्ही असेच नेहमी संपर्कात राहू, चर्चा करू... आम्ही काही गोष्टींवर सहमत असू, कधी असहमत असू... पण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. विश्वविजेत्या संघाबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. सांघिक खेळीच्या जोरावर हे यश मिळवले आहे, असे द्रविड यांनी आणखी सांगितले.
दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला.