Rinku Singh On IPL Salary & Rohit Sharma : आयपीएल २०२४ चा हंगाम रिंकू सिंगसाठी काही खास राहिला नाही. पण, मागील हंगामात त्याने स्फोटक खेळी करून एक नवीन ओळख निर्माण केली. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ चा किताब जिंकला. रिंकू सिंग केकेआरच्या संघाचा भाग असून, तो ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा राखीव खेळाडू म्हणून हिस्सा आहे. आयपीएल जिंकल्यानंतर आणि विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी रिंकूने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
रिंकू सिंगने त्याच्या कमाईबद्दल भाष्य केले. तो म्हणाला की, मला आयपीएलमधून मिळत असलेली ५५ लाख रूपयांची रक्कम खूप आहे. मी मोठा होत असताना त्यावेळी मी केवळ ५-१० रूपये कसे मिळवू शकतो याचा विचार करत असे. पण, आता माझा आयपीएलमधील पगार ५५ लाख रूपये आहे, जो माझ्यासाठी खूपच जास्त आहे. देव जेवढे देतो त्यातच खुश राहायला हवे असे मला वाटते.
रिंकूची 'मन की बात'भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना रिंकूने सांगितले की, रोहित शर्मा नेहमी युवा खेळाडूंना सहकार्य करतो. कर्णधार म्हणून त्याने मिळवलेले यश जगासमोर आहे. युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी असे त्याला नेहमी वाटते. ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची पहिली बॅच अमेरिकेला रवाना झाली आहे.
दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात केकेआरने मोठा विजय मिळवून किताब जिंकला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने स्फोटक खेळी केली. केकेआरचा संघ सर्वप्रथम २०१२ मध्ये आयपीएलचा चॅम्पियन झाला होता. त्यानंतर २०१४ आणि २०२४ मध्ये त्यांना किताब जिंकण्यात यश आले. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली एकदा आयपीएल जिंकली.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.