Join us  

अधिक काही बोलायचे नाही, मी त्याला...! राहुल द्रविडबाबतचा 'तो' प्रश्न विचारताच रोहित शर्मा भावुक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडविरुद्धच्या लढतीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवासाला सुरुवात करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 9:36 PM

Open in App

T20 World Cup 2024 :  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडविरुद्धच्या लढतीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवासाला सुरुवात करणार आहे. रोहित त्याचा ८ वा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळतोय आणि भारताचा ११ वर्षांपासूनचा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ रोहित अँड टीम यंदा संपवेल अशी सर्वांना आशा आहे. रोहित, विराट कोहली यांचा कदाचित हा शेवटचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असू शकतो, त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. आयर्लंडविरुद्धच्या लढतीपूर्वी जेव्हा रोहितला माजी कर्णधार द्रविडबाबत विचारण्यात आले, तेव्हा तो भावनिक झाला. 

द्रविडने नोव्हेंबर २०२१ मध्ये रवी शास्त्री यांच्याकडून भारतीय संघाची सूत्रे हाती घेतली.  द्रविडच्या कार्यकाळात भारताने १७ पैकी १४ ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या. यात इंग्लंड व न्यूझीलंड येथील मालिकांचाही समावेश आहे. १४ पैकी १० वन डे मालिका आणि ८ पैकी ६ कसोटी मालिका भारताने या काळात जिंकल्या.

आयर्लंडविरुद्धच्या लढतीपूर्वी रोहित म्हणाला,''आमचे लक्ष फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यावर आहे, विरोधी संघ काय करत आहे यावर नाही. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत खेळता, तेव्हा एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे होते. आम्ही याबद्दल खूप बोललो आहोत. मी कालचा सामना पाहिला नाही. माझे कुटुंब येणार होते त्यामुळे मी त्यात व्यस्त होतो. खेळपट्टीचा विचार केला तर चार खेळपट्टी आहेत. आम्ही कोणत्या खेळपट्टीवर खेळू हे आम्हाला माहीत नाही. अशा खेळपट्टीमध्ये फलंदाजीबरोबरच गोलंदाजीही महत्त्वाची असते.''

''अमेरिकेत आम्हाला क्रिकेट खेळायला मिळेल असे कधीच वाटले नव्हते. स्थानिक लोक तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. हा योग्य निर्णय आहे असे वाटते,''असे रोहित म्हणाला. त्याने पुढे ४ फिरकीपटू निवडण्याच्या निर्णयावर भाष्य केले. तो म्हणाला,येथे स्पिनरची भूमिका महत्त्वाची असेल. आमचे दोन फिरकीपटू जडेजा आणि अक्षर हे अष्टपैलू आहेत. संघाचा समतोल साधायचा असेल तर अष्टपैलू खेळाडू हवेत. वेगवान गोलंदाजांमध्ये आमच्याकडे हार्दिक आणि शिवम आहेत. त्यांचा वापर कसा करायचा याचा विचार केला. या चौघांची भूमिका मोठी असेल. हे चौघे एकत्र खेळू शकतील की नाही ते बघू. द्रविडची प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा''तो माझा पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार होता. आम्ही त्याला खेळताना पाहिले. तो आपल्या सर्वांसाठी एक उत्तम आदर्श आहे. गेल्या काही वर्षांत त्याने संघासाठी खूप काही केले. आम्ही त्याच्यासोबत जवळपास सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या. आम्हाला हे करायचे आहे, हे संघासाठी महत्त्वाचे आहे, असे सांगणारा तो पहिला व्यक्ती आहे. मी वैयक्तिकरित्या त्याला प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्याच्या स्वतःच्या प्राधान्यक्रम आहेत. मी त्याला जाताना पाहू शकणार नाही,''असे सांगताना रोहित भावनिक झाला. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024राहुल द्रविडरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआयर्लंड