Join us  

शतक, अर्धशतकाचा मी फार विचार करत नाही; कर्णधार रोहित शर्माचं विधान 

गोलंदाजांवर निर्माण करायचा होता दबाव; रोहित शर्मा अर्धशतक, शतक नाही महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 7:22 AM

Open in App

ग्रोस आइलेट : विक्रमी शतक झळकावण्यात तो कदाचित चुकला असेल; पण भारतीय कर्णधार रोहित शर्माला वैयक्तिक कामगिरीने काही फरक पडत नाही. मैदानात चौफेर फटकेबाजी करून गोलंदाजांवर दबाव आणणे, हेच त्याचे एकमेव उद्दिष्ट होते. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुपर आठ फेरीतील अखेरच्या सामन्यात ४१ चेंडूंत सात चौकार आणि आठ षट्‌कारांसह ९२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने पाच बाद २०५ धावा करत स्पर्धेतील आपली सर्वोच्च धावसंख्या उभारली. 

भारताने हा सामना २४ धावांनी जिंकला. टी-२० विश्वचषकात सर्वांत वेगवान शतकाचा विक्रम वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने २०१६ मध्ये ४७ चेंडूंत शतक झळकावले होते. रोहित हा विक्रम मोडू शकला असता.

रोहित म्हणाला की, आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. जेव्हा तुम्ही खुल्या मनाने खेळता, तेव्हा एका फटक्याचा विचार करत नाही. तेव्हाच तुम्ही मैदानाच्या सर्व भागांमध्ये धावा करू शकता. ही एक चांगली खेळपट्टी होती आणि तुम्ही योग्य फटके मारण्यासाठी स्वतःला तयार करता. मी काही वर्षांपासून असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आज ते शक्य झाले याचा आनंद आहे.

रोहित म्हणाला की, अर्धशतक आणि शतकामुळे काही फरक पडत नाही. मी ज्या शैलीत फलंदाजी करत आलो आहे, त्याच शैलीत फलंदाजी करायच्या प्रयत्नात होतो. तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची आहे; पण त्याचवेळी गोलंदाजांची मानसिकता ओळखणे गरजेचे ठरते. मी ते करण्यात यशस्वी ठरलो. 

रोहित म्हणाला की, वारे वेगाने वाहत आहेत हे मला पहिल्याच षटकात लक्षात आले. त्यांनी योजना बदलली आणि हवेच्या विरुद्ध गोलंदाजी केली. त्यामुळे ऑफ साइडलाही खेळायला हवे, असे मला वाटले. दोन विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवबाबत रोहित म्हणाला की, कुलदीपची ताकद आम्हाला माहिती आहे. पण, गरज पडेल तेव्हाच त्याचा वापर करायला हवा. न्यूयॉर्कमधील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी सहायक होत्या; पण तो येथे यशस्वी ठरेल हे आम्हाला ठाऊक होते. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया