भारताने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकताच कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाने जोरदार जल्लोष केला. जेव्हा रोहित ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर गेला तेव्हा त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. रोहित रोबोट ज्यापद्धतीने चालतो त्या शैलीत चालताना दिसला. तो थांबत थांबत स्टेजच्या दिशेने गेला. भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. तब्बल १३ वर्षांनंतर भारताला आयसीसीचा किताब जिंकता आला.
खरे तर रोहित शर्मालाकुलदीप यादवने सेलिब्रेशनची कल्पना सुचवली होती. चॅम्पियन रोहित ट्रॉफी घेण्यासाठी जात असताना कुलदीपच्या शेजारी उभा होता. यावेळी त्याने हातवारे करत हिटमॅनला सेलिब्रेशन समजावून सांगितले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत अखेरच्या षटकात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह यांची घातक गोलंदाजी... याशिवाय सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला अप्रतिम झेल यामुळे सामन्याचा निकाल बदलला.
...अन् भारत झाला विश्वविजेता २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला. भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला.