T20 World Cup 2024 SA vs NED Live : दक्षिण आफ्रिकेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सने पुन्हा रडकुंडीला आणले. नेदरलँड्सने मागील दोन वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेला पराभूत केले होते आणि आजही तशीच चिन्हे होते. १०४ धावांचे माफक आव्हानही आफ्रिकेला डोईजड झाले आणि त्यांना शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करायला लागला. डेव्हिड मिलर व त्रिस्तान स्तब्स यांनी आफ्रिकेचा विजय निश्चित केला.
मार्को यान्सेन ( २-२०), एनरिच नॉर्खिया ( २-१९), ऑथनेल बार्टमन ( ४-११) यांनी प्रभावी कामगिरी केली. अप्रतिम झेल, भन्नाट रन आऊट अन् चपळ क्षेत्ररक्षण याही सामन्यात आफ्रिकेकडून पाहायला मिळाले. सेब्रँड इगलब्रेच ( ४०) आणि लॉगन व्हॅन बीक ( २३) यांनी सातव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करून संघाला ९ बाद १०३ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, क्विंटन डी कॉक पहिल्याच चेंडूवर रन आऊट होऊन माघारी परतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डायमंड डकवर बाद होणारा क्विंटन डी कॉक तिसरा फलंदाज ठरला. लॉगन व्हॅन बीकच्या अप्रतिम चेंडूवर रिझा हेंड्रिक्स ( ३) त्रिफळाचीत झाला. हेंड्रिक्स स्तब्ध उभा राहिला.
तिसऱ्या षटकात एडन मार्करम भोपळ्यावर बाद झाल्याने आफ्रिकेला ३ धावांवर ३ धक्के बसले. भरवशाचा हेनरिच क्लासेनही ( ४) अपयशी ठरला आणि व्हिव्हियन किंगमाने त्याची दुसरी विकेट घेतली. १२ धावांवर ४ फलंदाज माघारी परतल्याने आफ्रिका आणखी अडचणीत सापडली. त्यांना १० षटकांत ४ बाद ३२ धावाच करता आल्या. डेव्हिड मिलर व त्रिस्तान स्तब्स यांच्यावर भीस्त होती आणि त्यांनी ५५ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. विजयासाठी २४ चेंडूंत २९ धावांची गरज असताना आफ्रिकेला धक्का बसला. बॅस दी लीडने १७व्या षटकात त्रिस्तानला ( ३३) बाद केले आणि ७२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी तुटली.