T20 World Cup 2024 SA vs NED Live : दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँडविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मार्को यान्सेन ( २-२०), एनरिच नॉर्खिया ( २-१९), ऑथनेल बार्टमन ( ४-११) यांच्यासह आफ्रिकेच्या सर्वच गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. क्षेत्ररक्षणात आफ्रिकन खेळाडूंच्या कामगिरीला तोड नाही, हे वेगळं सांगायला नको. अप्रतिम झेल, भन्नाट रन आऊट अन् चपळ क्षेत्ररक्षण याही सामन्यात त्यांच्याकडून पाहायला मिळाले. सेब्रँड इगलब्रेच आणि लॉगन व्हॅन बीक यांनी सातव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करून संघाला शतकी पार नेले.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्ल्ड कप ( २०२२ चा ट्वेंटी-२० व २०२३ चा वन डे ) स्पर्धेत नेदरलँड्सने त्यांना पराभूत केले आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सने पहिल्या सामन्यात नेपाळवर विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेनेही विजयी सलामी देताना श्रीलंकेला मात दिली होती. त्यामुळे विजयी लय कोण कायम राखतं याची उत्सुकता आहे. मार्को यान्सेनने तिसऱ्याच चेंडूवर ऑरेंज आर्मीचा सलामीवीर मिचेल लेव्हिटला भोपळ्यावर माघारी पाठवले. नो बॉलमुळे विक्रमजीत सिंगला मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलता नाही आला आणि यान्सेनने त्याचा ( १२) त्रिफळा उडवला. त्यापूर्वी ऑथनेल बार्टमनच्या गोलंदाजीवर मॅक्स ओ'डाऊडचा ( २) स्लीपमध्ये यान्सेनने अफलातून झेल घेतला.