T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १३ वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत भारतासमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान असणार आहे. २७ जूनला गयाना येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने कर्णधार रोहितला वेगळीच भीती सतावत आहे. या लढतीपूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रोहितने आज भन्नाट बॅटिंग केली. त्याने यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याच्या बॉल टॅम्परिंगच्या आरोपापासून ते ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आल्याच्या प्रश्नावर दमदार उत्तर मिळाले.
चार फिरकीपटूंना खेळवण्याबाबात रोहित म्हणाला, इतर संघ पाच वेगवान गोलंदाज आणतात आणि त्यांना एकत्र खेळवत नाही. आम्ही एकाच वेळी तीन फिरकीपटूंना खेळवत आहोत. आता खेळपट्टीवर कव्हर होते. आम्ही त्यावर रोलर चालवत आहोत आणि उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर आम्ही काय करायचे ते ठरवू. उद्याच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे, पण आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहू. हे असे पहिल्यांदाच घडत नाही. पावसामुळे आम्हाला फायदा होईल, असे मला वाटत नाही. मला ही भीती वाटत आहे की जर हा सामना बराच काळ लांबला तर आम्हाला रात्रीच्या चार्टर्ड फ्लाइटला मुकावे लागेल. मात्र, ही समस्या वेस्ट इंडिज क्रिकेट आणि आयसीसीची आहे.
उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करायचा आहे आणि त्याबद्दल विचारले असता रोहित म्हणाला, आमच्यासाठी हा एक नवीन सामना आहे, परंतु ही उपांत्य फेरी आहे, हे प्रत्येकाला ठावूक आहे. पण त्यावर सतत न बोलता प्रत्येकाला चांगली कामगिरी करावी लागेल. अनेक सामन्यांमध्ये आम्ही दडपणाखाली गेलो, पण आम्ही चांगला प्रतिसाद दिला. हा बाद फेरीचा खेळ आहे, आम्ही चांगले खेळून कसे जिंकायचे याचा विचार करत आहोत.
ऑस्ट्रेलियन संघ आता स्पर्धेत नाही, ही सर्वात मोठी गोष्ट आहे, असे उत्तर रोहितने कागारूंच्या एक्झिटवर हसून दिले.