पाकिस्तानने शेवटच्या वेळी २००९ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला होता. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ साठी पाकिस्तानने आपला १५ सदस्यीय संघ शुक्रवारी जाहीर केला. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने आगामी स्पर्धेबद्दल बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य करताना पाकिस्तानी संघाची मजबूत बाजू सांगितली. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर होत असलेल्या विश्वचषकात खेळताना पाकिस्तानी खेळाडूंना अधिक मदत होईल असा विश्वास आफ्रिदीने व्यक्त केला.
शाहिद आफ्रिदी म्हणाला की, मला वाटते की जगातील कोणत्याच संघात पाकिस्तानसारखी मजबूत गोलंदाजी नाही. आमच्या संघातील चारही गोलंदाज प्रभावी कामगिरी करण्यात पटाईत आहेत. बाकावर असणारा (अब्बास आफ्रिदी) त्याच्याकडे धिम्या गतीने चेंडू टाकण्याची कला आहे. जर वर्ल्ड क्लास संघांविरूद्ध हे वर्ल्ड क्लास खेळाडू मैदानात असतील तर नक्कीच कामगिरी चांगली होईल. पाकिस्तानी संघातील प्रत्येक खेळाडूवर मोठी जबाबदारी आहे.
पाकिस्तान विश्वचषकाचा प्रबळ दावेदार - आफ्रिदी तसेच पाकिस्तानने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठावी असे मला वाटते. कारण वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील खेळपट्टी त्यांच्यासाठी मदतशीर असेल. मला कल्पना आहे आमच्या संघातील फिरकीपटू फॉर्ममध्ये नाहीत... पण ते यावर काम करत आहेत. फलंदाजांचा स्ट्राईक रेट हा महत्त्वाचा विषय आहे. ७ ते ११ या षटकात धिम्या गतीने धावा होत आहेत. त्यामुळे स्ट्राईक वाढवण्याची गरज आहे, एका षटकात किमान ९ धावा काढणे आवश्यक आहे. पण तरीदेखील विश्वचषकासाठी पाकिस्तान प्रबळ दावेदार आहे, असेही शाहिद आफ्रिदीने सांगितले.
विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आजम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम आयुब, शाबाद खान, शाहिन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
पाकिस्तानचे विश्वचषकातील सामने - ६ जून – अमेरिका विरुद्ध, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, डॅलस९ जून – भारत विरुद्ध, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क११ जून - कॅनडा विरुद्ध, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क१६ जून – आयर्लंड वि. सेंट्रल ब्रोवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा