T20 World Cup 2024 : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तीन विजय मिळवून सुपर ८ मध्ये दाखल झाला आहे. अ गटातील त्यांचा शेवटचा साखळी सामना १५ जूनला मियामी येथे कॅनडाविरुद्ध होणार आहे आणि या सामन्यात विजयी लय कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. पण, या सामन्यानंतर भारतीय संघातील दोन शिलेदार मायदेशात परतणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार शुबम गिल जो सध्या भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून अमेरिकेत आहे, तो भारतात परतणार आहे. त्याच्यासोबत दुसरा राखीव खेळाडू आवेश खान हाही मायदेशात परतणार असल्याचे वृत्त आहे.
गुरुवारपर्यंत, दोन्ही खेळाडू फ्लोरिडामध्ये आहेत. या दोघांनी बुधवारी चार्टर्ड फ्लाइटने न्यूयॉर्कहून फोर्ट लॉडरडेलला संघासह उड्डाण केले. बुधवारी दुपारी लाँग आयलंडमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यानंतर भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांसाठी चार्टर विमानाची सोय केली होती. गिल आणि आवेश या दोघांचा प्रवास फक्त यूएस लेगपर्यंत होता. या स्पर्धेदरम्यान प्रमुख १५ खेळाडूंपैकी कुणाला अनपेक्षित दुखापत झाली तर खबरदारीचा उपाय म्हणून गिल व आवेश यांना BCCI ने राखीव खेळाडू म्हणून सोबत राहण्यास सांगितले होते.
१४ जून रोजी नियोजित सराव दरम्यान किंवा दुसऱ्या दिवशी सामन्यात नियमित खेळाडू जखमी झाल्यास या राखीव खेळाडूंना थांबण्यास सांगितले जाऊ शकते. मात्र, परंतु याची शक्यता फारच कमी आहे कारण फ्लोरिडातील हवामान सामना रद्द करू शकते. तिसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल देखील संघात आहे आणि त्याला अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची गरज भासणार नाही, कारण संघाला कॅरेबियन लेगमध्ये फिरकीपटूंवर अधिक अवलंबून राहण्याची अपेक्षा आहे.
३० एप्रिल रोजी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आला तेव्हा निवड समितीने गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांना राखीव खेळाडू म्हणून निवडले होते. सध्या रिंकू आणि खलील संघासोबत राहू शकतात आणि ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे प्रवास करू शकतात. जिथे भारत सुपर ८ मधील पहिला सामना २० जून रोजी खेळणार आहे. इतर दोन सुपर ८ सामने २२ जून रोजी अँटिग्वा आणि २४ जून रोजी सेंट लुसिया येथे आहेत. जर संघाने उपांत्य फेरी गाठली तर ते २७ जून रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे खेळतील. २९ जून रोजी ब्रिजटाऊनसाठी अंतिम सामना होणार आहे.