T20 World Cup Points Table : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील २३ वा सामना श्रीलंका आणि नेपाळ यांच्यात होणार होता. पण, पावसाच्या कारणास्तव सामना रद्द झाल्याने श्रीलंकेला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. सामना रद्द होताच नेपाळ आणि श्रीलंका या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला. खरे तरे सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांचे नुकसान झाले. या रद्द झालेल्या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका सुपर ८ मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. फ्लोरिडातील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर हा सामना होणार होता, परंतु पावसाची बॅटिंग अन् दोन्ही संघांचे नुकसान झाले.
ड गटातील नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला. दरम्यान, या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिका सुपर ८ मध्ये जाणार हे निश्चित होते. कारण त्यांनी सर्व तीन सामने जिंकले आहेत. पण, नेपाळविरूद्धचा सामना रद्द झाल्याने श्रीलंकेला मोठा फटका बसला. त्यांनी सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत आणि तिसरा सामना रद्द झाल्याने त्यांच्या खात्यात केवळ एक गुण आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतूत बाहेर झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेची सुपर ८ मध्ये धडकतर, नेपाळने पहिला सामना जिंकला होता तर दुसरा सामना रद्द झाला होता. त्यामुळे नेपाळच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. पण त्यांच्याकडे सुपर ८ मध्ये जाण्याची अद्याप संधी आहे. येथून पात्र होण्यासाठी नेपाळला पुढील दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत करावे लागेल. याशिवाय नेदरलँड्स संघ आपले शेवटचे दोन सामने गमावेल अशी आशा त्यांना करावी लागेल.
विशेष बाब म्हणजे फ्लोरिडा येथे होत असलेल्या सामन्यांवर पावसाचे सावट कायम आहे. इथे आणखी तीन सामने खेळवले जाणार आहेत. अशा स्थितीत पुढील तीन सामन्यांमध्ये पाऊस बॅटिंग करणार का हे पाहण्याजोगे असेल. फ्लोरिडा येथे पुढील सामना १४ जून रोजी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. यानंतर पुढील सामना १५ जून रोजी भारत आणि कॅनडा आणि त्यानंतर १६ जून रोजी पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात याच मैदानावर आमनेसामने असतील. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास शेजाऱ्यांचे मोठे नुकसान होईल. कारण त्यांनी तीनपैकी केवळ एक सामना जिंकला आहे.