T20 World Cup 2024 मध्ये श्रीलंकेच्या संघाने आपल्या यंदाच्या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा तब्बल ८३ धावांनी पराभव केला. दोन्ही संघांना साखळी सामन्यात गाशा गुंडाळावा लागला पण श्रीलंकेने टी२० विश्वचषकाचा शेवट गोड केला, तर नेदरलँड्सला पराभवासह निरोप घ्यावा लागला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ६ बाद २०१ धावा केल्या. २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सला मात्र ११८ धावाच करता आल्या. श्रीलंकेने ४ सामन्यात १ विजय मिळवत ३ गुणांसह तर नेदरलँड्सने ४ सामन्यात १ विजयासह २ गुणांवर स्पर्धेतून निरोप घेतला.
एकीकडे अमेरिकेतील सामन्यांमध्ये भलेभल्या संघांची शंभरी गाठतानाही दमछाक होत होती. पण वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेने २०१ धावांपर्यंत मजल मारली. चरिथ असलंका आणि कुसल मेंडिस या दोघांनाही अर्धशतकाने हुलकावणी दिली. असलंकाने २१ चेंडूत ४६ धावा केल्या, तर कुसल मेंडिसने २९ चेंडूत ४६ धावा केल्या. तर धनंजय डि सिल्वाने २६ चेंडूत ३४ धावा केल्या. याशिवाय, अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने १५ चेंडूत नाबाद ३० धावा आणि वानिंदू हसरंगाने ६ चेंडूत नाबाद २० धावा करत श्रीलंकेला ६ बाद २०१ धावांपर्यंत मजल मारली. नेदरलँड्सकडून लोगान वॅन बीक याने ४५ धावांत सर्वाधिक २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात नेदरलँड्सच्या संघाला फारशी चांगली खेळी करता आली नाही. सलामीवीर मायकल लेव्हीटने २३ चेंडूत ३१ धावा केल्या. मॅक्स ओ'डौडने ११, विक्रमजीत सिंहने ७, सिब्रँड एंगलब्रेचने ११ धावा केल्या. स्कॉट एडवर्ड्सने २४ चेंडूत ३१ धावांची झुंज दिली. मधल्या फळीतील आणि तळाच्या फलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. अखेर नेदरलँड्सचा डाव ११८ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून नुवान तुषाराने ३ तर हसरंगा, पाथिरानाने २-२ विकेट्स घेतल्या.