harmanpreet kaur injury : भारताच्या महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला असला तरी टीम इंडियाचा खडतर प्रवास कायम आहे. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने दारुण पराभव केल्याने भारताच्या अडचणीत वाढ झाली. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवेल आणि नेट रनरेट सुधारेल असे अपेक्षित होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे काहीच न झाल्याने भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुढील दोन सामन्यांमध्ये मोठे विजय मिळवावे लागतील. सध्या यूएईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारताच्या गटात बलाढ्य ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. टीम इंडियाचा पुढील सामना श्रीलंकेशी होणार आहे. पण, या आधी भारताची डोकेदुखी वाढली.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याने ती पुढच्या सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करुन भारताने विजयाचे खाते उघडले. पण, कर्णधार हरमनप्रीत कौर फलंदाजी करत असताना तिला दुखापत झाली. मग तिला निम्म्यातूनच मैदान सोडावे लागले. ती २४ चेंडूत २९ धावा करुन तंबूत परतली. तिच्या मानेला दुखापत झाली असल्याचे कळते.
दरम्यान, हरमनप्रीत कौर पुढच्या सामन्यात खेळणार की नाही अशी चर्चा रंगली आहे. भारताचा पुढील सामना श्रीलंकेशी होणार आहे, त्यांना पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. हरमन या सामन्याला मुकल्यास स्मृती मानधना टीम इंडियाचे नेतृत्व करेल हे स्पष्ट आहे. ९ तारखेला होत असलेला श्रीलंकेविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रनरेट सुधारण्यावर भारतीय शिलेदारांचे लक्ष असेल.