T20 World Cup 2024: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या लढतीत धावांचा पाऊस पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २०१ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यांची ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांनी १९७ धावा केल्या होत्या. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत दोनशेपार धावा करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच संघ ठरला. पण, या सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला, जिथे भारतीय अम्पायर नितीन मेनन ( umpire Nitin Menon ) यांनी ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) याला फटकारले.
डेड बॉलसाठी वेड मागणी करत होता, परंतु मेनन यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि गपचूप फलंदाजी कर असा इशारा केला. मेननची ही रिअॅक्शन पाहून वेडही आश्चर्यचकित झाला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील १८व्या षटकात लेग स्पिनर आदील राशीदच्या चेंडूवर वेडने चौकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडूवर राशीदने चेंडू टाकल्यानंतर वेडने आपण तयार नसल्याचे सांगून बॅटने चेंडू अडवला. अम्पायर हा डेड बॉल देतील असे वेडला अपेक्षित होते, परंतु मेनन यांनी चेंडू योग्य ठरवला. हे पाहून वेड त्यांच्याशी हुज्जत घालायला पुढे आला, तितक्यात मेनन यांनी त्याला परत फलंदाजीला जा असा इशारा केला.