T20 World Cup 2024 Updates : अफगाणिस्तानने बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारून सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवला. पण, सुपर-८ मध्ये प्रवेश करताच या आशियाई संघाला मोठा झटका बसला. साखळी फेरीत चांगली कामगिरी करणारा फिरकीपटू मुजीब उर रहमान दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी हजरतुल्लाह जजईला संघात स्थान मिळाले आहे. युवा फिरकीपटू मुजीब उर रहमान अफगाणिस्तानच्या ट्वेंटी-२० संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र बोटाच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर व्हावे लागले आहे. मुजीबने ४६ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६.३५ च्या सरासरीने एकूण ५९ बळी घेतले आहेत.
मुजीब उर रहमानच्या जागी अनुभवी फलंदाज हजरतुल्लाह जजईचा अफगाणिस्तानच्या संघात समावेश करण्यात आला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघाने फिरकीपच्या जागी फलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. हजरतुल्लाह हा डावखुरा स्फोटक फलंदाज आहे. त्याला वर्ल्डकपचा फारसा अनुभव आहे. अफगाणिस्तानसाठी गेल्या दोन हंगामांमध्ये त्याने राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
अफगाणिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलाबदिन नायब, करीम जनात, नांग्याल खरोती, नूर अहमद, नवीन-उल हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, हजरतुल्लाह जजई.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या पापुआ न्यू गिनीविरूद्धच्या विजयामुळे न्यूझीलंडचे यंदाच्या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ क गटात आहेत. या गटातून सुपर-८ साठी पात्र ठरणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला. त्यांनी तीनपैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला. दुसरीकडे न्यूझीलंडने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. अफगाणिस्तानने तीनपैकी सर्व तीन सामने जिंकून सहा गुणांसह सुपर-८ मध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता न्यूझीलंडने उर्वरीत सामना जिंकला तरी त्यांना सुपर-८ ची फेरी गाठता येणार नाही. त्यामुळे किवी संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर-८ साठी पात्र ठरणार आहेत, त्यानुसार क गटातून यजमान वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी ६-६ गुणांसह पात्रता फेरी गाठली.