ICC Fined Tanzim Hasan Sakib : आजपासून ट्वेंटी-२० विश्वचषकात सुपर-८ च्या सामन्यांचा थरार रंगत आहे. बांगलादेशने सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे. बुधवारी अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होत आहे. अशातच बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तन्जीम हसन साकिबवर आयसीसीने मोठी कारवाई केली. १६ जून रोजी नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. या लढतीदरम्यान तन्जीमने नेपाळचा कर्णधार रोहित पॉडेलसोबत वाद घातला. त्यामुळे आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला त्याच्या मॅच फीच्या १५% दंड ठोठावण्यात आला आहे. नेपाळच्या डावाचे तिसरे षटक संपल्यानंतर ही घटना घडली, जेव्हा तन्जीम आक्रमकपणे नेपाळचा फलंदाज रोहित पॉडेलकडे चेंडू टाकल्यानंतर गेला आणि त्याच्याशी वाद घालू लागला.
नेपाळचा कर्णधार आणि तन्जीद यांच्यात काही वेळ वाद सुरू होता. त्यांचे हातवारे सर्वकाही सांगत होते. काही वेळ बाचाबाची देखील झाली. मग मैदानातील पंचांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. या घटनेनंतर पंचांनी बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोला जवळ बोलावून समज दिली. तन्जीम ICC आचारसंहितेच्या कलम २.१२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळून आला, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बांगलादेशचा खेळाडू तन्जीद हसन साकिबच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. २४ महिन्यात त्याने प्रथमच ही चूक केली. खरे तर जेव्हा एखादा खेळाडू २४ महिन्यांच्या कालावधीत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुणांवर पोहोचतो, तेव्हा तो निलंबनास पात्र ठरतो आणि खेळाडूवर बंदी घातली जाते. दोन निलंबनामुळे खेळाडूला एक कसोटी किंवा दोन वन डे किंवा दोन ट्वेंटी-२० सामन्यांमधून बंदी घातली जाते. तन्जीद साकिबवर मैदानावरील पंच अहसान रझा आणि नोगाज्स्की यांच्यासह तिसरे पंच जयरामन मदनगोपाल आणि चौथे पंच कुमार धर्मसेना यांनी आरोप केले होते.