सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. यासाठी भारतीय क्रिकेट संघ न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने टीम इंडियाच्या स्वागतासाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. याचे काही फोटो समोर आले आहेत. भारताचे कॉन्सुलेट जनरल बिनय श्रीकांत प्रधान यांनी ट्वेंटी-२० विश्वचषक खेळण्यासाठी अमेरिकेच्या धरतीवर आलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे यजमानपद भूषवले.
बिनय श्रीकांत प्रधान आणि न्यूयॉर्कमधील भारतीय प्रतिनिधींनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील संघाचे स्वागत केले. रोहित आणि द्रविड यांसह भारतीय शिलेदारांनी वेगवेगळ्या प्रदेशातील भारतीय गटाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे देखील उपस्थित होते.
न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून म्हटले की, न्यूयॉर्कमधील महावाणिज्य दूतावास आणि भारतीय गटाच्या प्रतिनिधींनी टीम इंडियाचे स्वागत केले. कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघातील इतर सदस्यांनी वेगवेगळ्या प्रदेशातील भारतीय गटाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. संपूर्ण टीमचे खासकरून बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे आभार.
दरम्यान, भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून विजयरथ कायम ठेवला आहे. आयर्लंडला नमवून टीम इंडियाने विजयी सलामी दिली, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध विजय साकारला. बुधवारी भारत आणि यजमान अमेरिका यांच्यात लढत होणार आहे. यातील विजयी संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. कारण दोन्हीही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत.