Join us  

IND vs AFG : "विराट-रोहितनं सावध राहावं...", अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी स्टेनचा इशारा

IND vs AFG : आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 1:40 PM

Open in App

T20 world cup 2024 updates : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर-८ च्या लढतींना सुरुवात झाली आहे. आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. अफगाणिस्तानला आपल्या मागील सामन्यात वेस्ट इंडिजकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, तो सामना केवळ एक औपचारिकता होती. कारण अफगाणिस्तानने विजयाची हॅटट्रिक मारून सुपर-८ मध्ये स्थान मिळवले होते. भारतीय संघाचा सलामीवीर विराट कोहलीला यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही मोठी खेळी करता आली नाही. त्याच्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा देखील अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात संघर्ष करताना दिसला. 

आयपीएल २०२४ मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा विराट विश्वचषकात मात्र फॉर्मच्या शोधात आहे. आयपीएलमध्ये विराटने सर्वाधिक ७४१ धावा करून ऑरेंज कॅप पटकावली. आज भारतीय संघ अफगाणिस्तानचा सामना करत आहे. या आशियाई संघाने आपल्या फिरकीपटूंच्या जोरावर न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली आहे. याचाच दाखला देत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेल स्टेनने भारतीय फलंदाजांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 

आज IND vs AFG थरार

डेल स्टेन म्हणाला की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी खूप सावध राहायला हवे. अफगाणिस्तानचे फिरकीपटू त्यांना पायात चेंडू टाकून फसवू शकतात. स्टेन अफगाणिस्तानचा गोलंदाज फझलहक फारूकी याच्याबद्दल 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलत असताना त्याने हा इशारा दिला. 

अफगाणिस्तानच्या फझलहक फारूकीने यंदाच्या विश्वचषकात सातत्याने चांगली कामगिरी केली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये १२ बळी घेतले आहेत. ९ धावा देऊन ५ बळी ही त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. स्टेन आणखी म्हणाला की, रहमनुल्लाह गुरबाजसारखा फलंदाज भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतो. तो जसप्रीत बुमराहचा कसा सामना करतो हे पाहण्याजोगे असेल. दरम्यान, सुपर-८ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान हे संघ पहिल्या गटात आहेत, तर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे देखील या गटात आहेत.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024विराट कोहलीरोहित शर्माभारत-अफगाणिस्तानभारतीय क्रिकेट संघ