Join us  

"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम

Harbhajan Singh vs kamran akmal : कामरान अकमल आणि भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:24 AM

Open in App

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल आणि भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यादरम्यान अकमलने अर्शदीप सिंगचा दाखला देत शीख समुदायाबद्दल वादग्रस्त विधान केले. अकमलच्या या विधानाची खबर लागताच हरभजनने संतप्त प्रतिक्रिया दिली. मग कामरान अकमलने हरभजनसह शीख समुदायाची माफी मागितली. आता हरभजनने पुन्हा एकदा अकमलवर बोचरी टीका केली आहे.

वृत्तसंस्था ANI शी बोलताना हरभजन म्हणाला की, कामरान अकमलचे हे एक अतिशय मूर्खपणाचे विधान आणि अतिशय बालिश कृत्य आहे जे केवळ 'नालायक' व्यक्ती करू शकते. कामरान अकमलने समजून घेतले पाहिजे तो नक्की काय बोलला आहे. कोणाच्याही धर्माबद्दल काहीही बोलण्याची आणि त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही, मी कामरान अकमलला विचारू इच्छितो की तुम्हाला शिखांचा इतिहास माहित आहे का? शीख तेच आहेत ज्यांनी तुमच्या समाजाला, तुमच्या माता-बहिणींना वाचवण्यासाठी सर्वकाही केले. हे तुमच्या पूर्वजांना विचारा. १२ वाजता वाजता शिखांनी मुघलांवर हल्ला केला आणि तुमच्या माता-भगिनींना वाचवले. म्हणूनच त्याने (अकमल) लवकर माफी मागितली ही एक चांगली बाब आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. मग तो हिंदू, इस्लाम, शीख किंवा ख्रिश्चन कोणताही धर्म असो. 

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या सामन्यातील शेवटचे षटक अर्शदीप सिंग टाकत होता. यावेळी सामन्याचे विश्लेषण करताना कामरान अकमलची जीभ घसरली. शेवटच्या षटकात अर्शदीपला १८ धावांचा बचाव करायचा होता. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल सामन्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेत बोलत असताना अर्शदीपबद्दल त्याने भाष्य केले. अर्शदीप सिंग २० वे षटक टाकत आहे. तो या षटकात भरपूर धावाही देऊ शकतो, असे कामरान अकमल म्हणाला. इतकेच नव्हे तर अर्शदीपबद्दल बोलताना त्याने शिख धर्माचा अपमानही केला. त्यावरून हरभजनने अकमलला प्रत्युत्तर दिले.

अकमलचा माफीनामा हरभजन सिंगने संताप व्यक्त करताच अकमलने माफी मागितली. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मी अलीकडे केलेल्या एका टिप्पणीचा मला खेद वाटतो आणि मी अगदी मनापासून याबद्दल माफी मागतो. हरभजन सिंग आणि शीख समुदायाने मला माफ करावे. माझे शब्द अयोग्य आणि अनादर करणारे होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. मला खरच माफ करा.

टॅग्स :हरभजन सिंगपाकिस्तानशीखअर्शदीप सिंग