Wasim Akram On Pakistan Team : कॅनडाला पराभूत करून पाकिस्तानने ट्वेंटी-२० विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवले आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर बाबर आझमच्या संघाने कॅनडाला नमवून विजयाचे खाते उघडले. पाकिस्तानला अमेरिका आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शेजारील देश विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर होण्याच्या वाटेवर आहे. पाकिस्तानी फलंदाजांची संथ खेळी संघाच्या खराब कामगिरीला कारणीभूत ठरत आहे. याचाच दाखला देत माजी खेळाडू वसीम अक्रमने पाकिस्तानच्या संघावर तोंडसुख घेतले.
यजमान अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात शेजाऱ्यांना टीम इंडियाकडून पराभव स्वीकारावा लागला. सलग दोन सामने गमावल्याने पाकिस्तानचे माजी खेळाडू बाबर आझमवर तुटून पडले. भारताने दिलेल्या १२० धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला घाम फुटला.
अक्रमचा पाकिस्तानी संघावर संताप'स्टार स्पोर्ट्स'वर बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, आता खूप झाले खूप वेळा पाकिस्तानच्या संघाला पाठिंबा दर्शवला आहे. आता मी जे बोलतोय ते व्हायरल झाले तरी पर्वा नाही. संघातील कोणाचा मूड ऑफ आहे, तर काहीजण एकमेकांशी बोलत नाहीत. पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे काय चालू आहे. त्यांनी संपूर्ण देशाच्या भावनांचा सत्यानाश केला आहे. हे आता थांबायला हवे, कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते.
तसेच आता जे झाले ते झाले. पाकिस्तानच्या संघात नवीन खेळाडूंना संधी द्यायला हवी. पाकिस्तानचे चाहते खूप दिवसांनी भारताविरूद्ध आम्ही जिंकत आहोत याचा आनंद साजरा करत होते. पण, आमच्या संघाला ते काम चोखपणे पार पाडता आले नाही. मला तर वाटते की, पाकिस्तानने ठरवले आहे की काहीही झाले तरी जिंकायचे नाही. आता त्यांनी आरशात जावे आणि स्वतःकडे बघावे आणि स्वतःहून सांगावे की नक्की काय चालले आहे. मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सल्ला देऊ इच्छितो की, आता नवीन संघ तयार करायला हवा. नवीन खेळाडूंना संधी द्यायला हवी. सतत पराभव होत आहे म्हणजे संघात बदल करणे आवश्यक आहे.