Join us  

T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला

T20 World Cup 2024, USA vs Canada Live : कॅनडाला नमवून यजमान अमेरिकेने विजयी सलामी दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 9:37 AM

Open in App

USA vs Canada Live Match Updates | डल्लास : आपला कट्टर प्रतिस्पर्धी कॅनडाला पराभवाची धूळ चारून यजमान अमेरिकेने विजयी सलामी दिली. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेने मोठा विजय मिळवला. कॅनडाने दिलेल्या १९५ धावांच्या तगड्या लक्ष्याचा सहज पाठलाग करत यजमानांनी घरच्या चाहत्यांना खुशखबर दिली. अँड्रिस गूस आणि आरोन जोन्स या जोडीने षटकारांचा पाऊस पाडून कॅनडाच्या गोलंदाजांना घाम फोडला. आरोन जोन्सने ४० चेंडूत १० षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या आणि अमेरिकेने ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजय साकारला. यजमानांनी १७.४ षटकांत १९७ धावा करून सहज लक्ष्य गाठले. विशेष बाब म्हणजे अमेरिकेने या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचला. 

अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल (१६) स्वस्तात माघारी परतला. मग अँड्रिस गूस आणि आरोन जोन्स यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी तब्बल १३१ धावांची भागीदारी नोंदवून विजयाकडे कूच केली. अँड्रिस गूस ४६ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकार ठोकून ६५ धावांवर बाद झाला. कॅनडाकडून कलीम साना, डिलन हेलिगर आणि निखिल दत्ता यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

तत्पुर्वी, कॅनडाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९४ धावा केल्या होत्या. आव्हान तगडे होते पण कॅनडाच्या गोलंदाजांना या धावांचा बचाव करता आला नाही. कॅनडाकडून नवनीत धालीवालने सर्वाधिक (६१) धावा केल्या, तर आरोन जॉन्सन (२३), परगट सिंग (५), निकोलस किर्टन (५१), श्रेयस मोवा (नाबाद ३२ धावा), डिलप्रीट बाजवा (११) आणि डिलन हेलिगर १ धाव करून नाबाद परतला. अमेरिकेकडून कोरी अँडरसन, हरमीत सिंग आणि अली खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

विश्वचषकाच्या एका डावात ८ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारे खेळाडू ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - ११ (२०१६)ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - १० (२००७)

आरोन जोन्स (अमेरिका) - १० (२०२४)*

दरम्यान, अमेरिकेच्या संघात न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू कोरी अँडरसनचा समावेश आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग राहिला आहे. याशिवाय २०१२ मध्ये भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा असलेला हरमीत सिंग देखील अमेरिकेच्या संघात आहे. त्याने राजस्थान रॉयल्सचेही प्रतिनिधित्व केले आहे. कॅनडाचा कर्णधार साद बिन जफर हा मूळचा पाकिस्तानातील गुजरांवाला येथील आहे, तर अमेरिकेचा कर्णधार मोनंक पटेल भारतातील गुजरात येथील आहे. 

अमेरिकेचा संघ -मोनंक पटेल (कर्णधार), स्टीव्हन टेलर, अँड्रिस गूस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शादले वॅन शल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान. 

कॅनडाचा संघ -साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोवा, डिलप्रीट बाजवा, डिलन हेलिगर, निखिल दत्ता, कलीम साना, जेरेमी गॉर्डोन. 

टॅग्स :अमेरिकाट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024कॅनडा