T20 World Cup 2024, USA vs IND : अमेरिका आणि भारत हे संघ आज विजयाची हॅटट्रिक मारण्याच्या इराद्याने मैदानात असतील. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये आज भारत आणि यजमान अमेरिका यांच्यात सामना होत आहे. दोन्हीही संघ आपले पहिले दोन सामने जिंकून इथे पोहोचले आहेत. आजच्या सामन्यातील विजयी संघाला सुपर ८ चे तिकीट मिळेल. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला अमेरिकेचा उपकर्णधार आरोन जोन्सने भारतीय संघाला इशारा दिला. भारत तगडा संघ असला तरी आम्ही इतर संघांप्रमाणेच त्यांच्याविरोधात खेळू असे त्याने म्हटले.
आरोन जोन्सन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये १३० धावा कुटल्या. सलामीच्या सामन्यात कॅनडाविरूद्ध जोन्सनने ४० चेंडूत ९४ धावांची नाबाद खेळी केली होती. यामध्ये १० षटकारांचा समावेश होता. भारताविरूद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना जोन्सनने विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
आरोन जोन्सची 'मन की बात'
तो म्हणाला की, भारत एक मजबूत संघ आहे. पण, आम्ही या आधी अनेकदा तगड्या संघांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्यात आम्ही नेहमीप्रमाणेच दिसू. भारत तगडा संघ असला तरी आम्ही समोर कोणता संघ आहे हे पाहून क्रिकेट खेळत नाही. आम्ही या आधी चांगल्या संघांचा पराभव केला आहे. आम्ही प्रत्येक सामन्याआधी रणनीती आखत असतो. प्रशिक्षक वेगवेगळ्या संघांचा सामना करताना आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे भारताविरूद्ध देखील असेच असेल यात काही वेगळे नसेल. या आधीच्या सामन्यात आम्ही पाकिस्तानला पराभूत केले. तो आमच्यासाठी एक मोठा विजय होता. घरच्या मैदानावर चाहत्यांकडून आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे.
दरम्यान, भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून विजयरथ कायम ठेवला आहे. आयर्लंडला नमवून टीम इंडियाने विजयी सलामी दिली, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध विजय साकारला. बुधवारी भारत आणि यजमान अमेरिका यांच्यात लढत होत आहे. यातील विजयी संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. कारण दोन्हीही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत.
Web Title: T20 World Cup 2024, USA vs IND Aaron Jones said India are a good team, but we will treat it like a normal game
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.