T20 WC 2024 USA vs IRE : अमेरिका आणि भारत यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानने कॅनडाविरूद्ध विजय मिळवला. त्यामुळे ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील त्यांचे आव्हान कायम आहे. आज शुक्रवारी यजमान अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होत आहे. या सामन्यातून पाकिस्तानी संघाचे भवितव्य ठरणार आहे. आजचा सामना अमेरिकेने जिंकल्यास किंवा पावसामुळे रद्द झाल्यास पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होईल. आयर्लंडचा विजय पाकिस्तानला स्पर्धेत जिवंत ठेवू शकतो. खरे तर पाकिस्तानचा साखळी फेरीतील अखेरचा सामना देखील आयर्लंडविरूद्ध होणार आहे. पण, त्यासाठी आज आयर्लंडचा विजय पाकिस्तानसाठी गरजेचा आहे. अन्यथा रविवारी होणारा पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामना म्हणजे केवळ औपचारिकता असेल.
फ्लोरिडा येथे आयर्लंड आणि अमेरिका यांच्यात लढत होत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने शेजाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. आज अमेरिकेने विजय मिळवल्यास ते सहा गुणांसह सुपर-८ साठी पात्र ठरतील. जर आयर्लंडने अमेरिकेला पराभूत केल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान कायम राहील. त्यामुळे आजचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
पाऊस पाकिस्तानला बुडवणार? पाकिस्तानचा शेवटचा सामना आयर्लंडविरूद्ध होणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्हीही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळेल. असे झाल्यास पाकिस्तान स्पर्धेबाहेर होईल आणि अमेरिका अ गटातून सुपर-८ मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल. लक्षणीय बाब म्हणजे फ्लोरिडा येथे या आठवड्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खासकरून अमेरिका विरूद्ध आयर्लंड आणि आयर्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्या सामन्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. सामन्याच्या ठिकाणी फ्लोरिडा येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे संघ अ गटात आहेत. भारताने तीन विजयांसह सुपर-८ चे तिकीट मिळवले आहे. अ गटातून भारतीय संघाने सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे. तर अमेरिका तीन सामन्यांपैकी दोन विजयासह ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्हीही संघांचा अखेरचा सामना आयर्लंडविरूद्ध होणार आहे. पाकिस्तानला सुपर-८ मध्ये जागा मिळवण्यासाठी शेवटचा सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागेल. याशिवाय अमेरिकेचा मोठ्या फरकाने पराभव होईल अशी प्रार्थना करावी लागेल.