T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात यजमान अमेरिकेने कॅनडाचा दारूण पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात अमेरिकेने ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजय साकारला. आपला कट्टर प्रतिस्पर्धी कॅनडाला पराभवाची धूळ चारून यजमान अमेरिकेने विजयी सलामी दिली. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेने मोठा विजय मिळवला. कॅनडाने दिलेल्या १९५ धावांच्या तगड्या लक्ष्याचा सहज पाठलाग करत यजमानांनी घरच्या चाहत्यांना खुशखबर दिली. अँड्रिस गूस आणि आरोन जोन्स या जोडीने षटकारांचा पाऊस पाडून कॅनडाच्या गोलंदाजांना घाम फोडला. आरोन जोन्सने ४० चेंडूत १० षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या आणि अमेरिकेने ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजय साकारला. यजमानांनी १७.४ षटकांत १९७ धावा करून सहज लक्ष्य गाठले.
यजमान अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात ६ जून रोजी सामना होणार आहे. अमेरिकेचा सध्याचा फॉर्म पाहता नेटकऱ्यांनी पाकिस्तानची फिरकी घेतली. दुसरीकडे पाकिस्तानी संघ इंग्लंडकडून दारूण पराभव स्वीकारून अमेरिकेला पोहोचला आहे.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाला तिथे एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली गेली. पावसाच्या व्यत्ययामुळे मालिकेतील दोन सामने रद्द करावे लागले. पण, दोन सामने जिंकून यजमान इंग्लंडने २-० ने मालिका खिशात घातली. ही मालिका संपताच पाकिस्तानी संघ अमेरिकेत दाखल झाला. आगामी विश्वचषकासाठी शनिवारी पाकिस्तानचे शिलेदार अमेरिकेच्या धरतीवर पोहोचले.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -
६ जून - पाकिस्तान विरूद्ध अमेरिका, डल्लास
९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क
११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क
१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील
Web Title: T20 World Cup 2024 USA vs PAK match on 6th netizens mocked the neighbors
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.