USA vs PAK T20 : क्रिकेट विश्वाला धक्का देत अमेरिकेने ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केला. सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर यजमानांनी बाजी मारली. या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंसह कर्णधार बाबर आझमवर सडकून टीका केली जात आहे. शेजारील देशातील माजी खेळाडू आपल्या संघाला घरचा आहेर देत आहेत. अशातच बाबर आझमने पराभवानंतर चूक मान्य करत हा एक मोठा उलटफेर असल्याचे सांगितले. तसेच त्याने अमेरिकन संघाच्या खेळीचे कौतुक केले. (USA vs PAK Super Over)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेने निर्धारित २० षटकांत ३ बाद तेवढ्याच १५९ धावा कुटल्या अन् सामना बरोबरीत राहिला. मग सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने १८ धावा काढून पाकिस्तानची बोलती बंद केली. १९ धावांचा पाठलाग करताना शेजाऱ्यांना अपयश आले आणि अमेरिकेने सुपर विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तान १ गडी गमावून केवळ १३ धावा करू शकल्याने ५ धावांनी सामना गमवावा लागला.
बाबरने दिली कबुलीपराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बाबर म्हणाला की, आमच्याकडे सर्वात घातक गोलंदाजी अटॅक आहे. त्यामुळे मला वाटते की अमेरिकेविरूद्ध १६० धावांचा बचाव व्हायला हवा होता. या खेळपट्टीवर ही धावसंख्या योग्य होती. होय, मी पराभवामुळे नाराज आहे अमेरिकेने चांगला खेळ करून मोठा उलटफेर केला.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
पाकिस्तानचे पुढील सामने - ९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील