Join us  

WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर; यजमानांचा झंझावात

T20 World Cup 2024, WI vs NZ Live : वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा पराभव करून सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 9:45 AM

Open in App

WI vs NZ Live Match Updates : यजमान वेस्ट इंडिजनेन्यूझीलंडचा पराभव करून आपला विजयरथ कायम ठेवला. विडिंजने सहा गुणांसह सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. या पराभवासह किवी संघाचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांना या आधी अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. वेस्ट इंडिजने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला अपयश आले आणि १३ धावांनी सामना गमवावा लागला. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. 

फिलिप्स वगळता किवी संघाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्याने २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ४० धावा कुटल्या. त्याच्याशिवाय फिन ॲलनने (२६) संयमी खेळी केली पण तोही आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर किवी संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद केवळ १३६ धावा करू शकला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक (४) बळी घेऊन किवी संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली. तर गुडाकेश मोती (३) आणि अकिल हुसैन आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

तत्पुर्वी, किवी संघाच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत यजमान विडिंजला १४९ धावांत रोखले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून शेरफेन रदरफोर्ड वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. याव्यतिरिक्त ब्रँडन किंग (९), जॉन्सन चार्ल्स (०), निकोलस पूरन (१७), रोस्टन चेस (०), रोवमन पॉवेल (१), अकिल हुसैन (१५), आंद्रे रसेल (१४), रोमारियो शेफर्ड (१३) आणि अल्झारी जोसेफने (६) धावा केल्या. अखेर यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १४९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांनी १-१ बळी घेतला. 

दरम्यान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ क गटात आहेत. या गटातून सुपर-८ साठी पात्र ठरणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला. त्यांनी तीनपैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला. दुसरीकडे न्यूझीलंडने दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत. अफगाणिस्तानने दोनपैकी दोन्ही सामने जिंकून चार गुणांसह सुपर-८ साठी दावा ठोकला आहे. खरे तर न्यूझीलंडने उर्वरीत दोन सामने जिंकल्यास आणि अफगाणिस्तानने उरलेले दोन्ही सामने गमावल्यास दोन्ही संघांचे ४-४ गुण राहतील. पण, नेटरनरेटच्या बाबतीत राशिद खानचा संघ वरचढ असल्याने ते सुपर-८ साठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक आहे. 

न्यूझीलंडचा संघ -केन विल्यमसन (कर्णधार), फिन ॲलन, डेव्होन कॉन्वे, डेरिल मिशेल, ग्लेम फिलिप्स, रचिन रवींद्र, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट. 

वेस्ट इंडिजचा संघ - रोवमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, रोस्टन चेस,  शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमारियो शेफर्ड, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024केन विल्यमसनवेस्ट इंडिजन्यूझीलंड