Rohit Sharma Latest News : विश्वचषकाची ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर रोहितने आयसीसीचा किताब जिंकण्याची किमया साधली. वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली. २९ जून रोजी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून रोहितसेनेने विजय मिळवला. मग विश्वविजेता भारतीय संघ मायदेशात पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
खरे तर भारताच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने कॅरेबियन बेटांवर ट्रॉफीसोबत फोटोसेशन केले. रोहितने टीम इंडियाची जर्सी घालून वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले. बीसीसीआयने याची झलक शेअर केली आहे. हिटमॅनचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे. यावेळी रोहितने घातलेले घड्याळ चर्चेचा विषय ठरले. विशेष बाब म्हणजे रोहितने घातलेल्या घड्याळाची किंमत तब्बल १.५ कोटी एवढी आहे.
रोहितने घातलेल्या घड्याळाविषयी भाष्य करायचे झाले तर, Audemars Piguet Royal Oak Perpetual Calendar हे नामांकित घड्याळ सुरुवातीला केवळ जपानी बाजारपेठेसाठी तयार करण्यात आले होते. परंतु २०२१ मध्ये या महागड्या घड्याळाने जागतिक स्तरावर प्रवेश केला. Audemars Piguet Royal Oak Perpetual Calendar नावाच्या या घड्याळात सॅल्मन ग्रँड टॅपिसरी आहे आणि ब्रेसलेटसह टायटॅनियम केस याचे सौंदर्य वाढवते. संपूर्ण जगात अशा प्रकारची फक्त १५० घड्याळे उपलब्ध आहेत.
दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला.