Join us  

'गुरू' द्रविडच्या पावलावर रोहितचं पाऊल; सपोर्ट स्टाफसाठी हिटमॅनने दाखवला दिलदारपणा!

कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:26 PM

Open in App

विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाला तब्बल १२५ कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले. या बक्षिसातील ५ कोटी एवढी रक्कम प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मिळणार होती. मात्र, दिलदार द्रविड यांनी बोनस म्हणून मिळणारी अतिरिक्त घेण्यास नकार दिला. द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणून मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार दिला आहे. गुरू द्रविड यांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितनेही बोनस रक्कम घेण्यास नकार दर्शवला असल्याचे कळते.

माहितीनुसार, रोहितने त्याच्या बोनसमधील रकमेत कपात करण्याची मागणी केली होती. रोहितला सपोर्ट स्टाफसाठी बोनसचा मोठा हिस्सा कमी करायचा होता. बीसीसीआयने दिलेल्या १२५ कोटी रूपयांच्या बक्षिसाचे वाटप कसे करायचे याबद्दल चर्चा सुरू असताना रोहितने इतर कर्मचाऱ्यांसाठी आवाज उठवला. सपोर्ट स्टाफला खूप कमी पैसे मिळत होते, तेव्हा रोहित म्हणाला की सपोर्टला कमी पैसे मिळू नयेत. जर पैसे कमी पडले तर ती रक्कम माझ्या बोनसमधून कापली जावी.  

टीम इंडियावर पैशांचा वर्षावबीसीसीआयने विश्वचषक विजेत्या संघाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ही रक्कम खेळाडू आणि कोचिंग स्टाफमधील ४२ सदस्यांमध्ये वाटली जाणार आहे. १२५ कोटी रुपयांमधून संघातील सर्व १५ सदस्य आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळतील. तर कोचिंग स्टाफमधील इतर सदस्यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये मिळणार आहेत. ट्वेंटी-२० विश्वचषकामध्ये राहुल द्रविड यांच्यासोबत सपोर्ट स्टाफमध्ये विक्रम राठोड, पारस म्हाम्ब्रे आणि टी. दिलीप यांचा समावेश होता.

दरम्यान, राहुल द्रविड यांनी विश्वविजयासाठी मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार दिला आहे. आपल्याला इतर कोचिंग स्टाफला मिळणाऱ्या रकमेएवढीच रक्कम देण्यात यावी अशी मागणी राहुल द्रविड यांनी केली. याचाच अर्थ राहुल द्रविड त्यांना मिळणाऱ्या ५ कोटी रुपये बक्षीसाच्या रकमेपैकी २.५ कोटी रुपयांवर पाणी सोडण्यास तयार आहेत. ते कोचिंग स्टाफमधील इतर सदस्यांप्रमाणेच २.५ कोटी रुपयेच घेतील.

टॅग्स :रोहित शर्माराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय