sourav ganguly rohit sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकला. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेतला. इथूनच भारतीय संघाने विजयाकडे खऱ्या अर्थाने कूच केली. दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर पहिलाच चेंडू सीमारेषेपार पोहोचवलाच होता, पण तितक्यात सूर्यकुमार यादव आफ्रिकन संघासाठी काळ ठरला. सीमारेषेजवळ सूर्याने अप्रतिम झेल घेऊन भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. या एका झेलमुळे सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला. तब्बल १३ वर्षानंतर भारतात आयसीसी ट्रॉफी आली.
२०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाची धुरा विराट कोहलीकडे आली. २०१७ ते २०२१ या कालावधीत विराटने भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले. पण, त्याच्या नेतृत्वात संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. विराटने २०२१ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. मग त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. २०२२ च्या सुरुवातीला विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. मग बीसीसीआयने रोहित शर्माला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. रोहितला कर्णधार बनवण्यात तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा मोठा हात होता. यावरून त्यांना टीकाकारांचाही सामना करावा लागला. याचाच दाखला देत क्रिकेटच्या दादाने भाष्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुलींनी सांगितले की, विराटच्या जागी रोहितला कर्णधार बनवल्याने चाहते नाराज होते. तेव्हा मला खूप टीकाकारांचा सामना करावा लागला. रोहितला कर्णधार बनवताच अनेकांनी माझ्यावर राग काढला. पण, आता टीम इंडिया चॅम्पियन झाली आहे, त्यामुळे टीकेला जागा नाही. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने ट्रॉफी जिंकल्याने मला कोणी शिवी देत नाही. आता सर्वजण विसरले आहेत की, मीच रोहितला कर्णधार बनवले होते.