Rohit Sharma News : भारतीय संघ आजपासून आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करत आहे. बलाढ्य टीम इंडियासमोर आयर्लंडचे आव्हान आहे. न्यूयॉर्कच्या नव्हेले स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर सर्वांच्या नजरा आहेत. अशातच कर्णधार रोहित शर्माने चारही फिरकीपटूंना संधी मिळणार असल्याचे संकेत दिले. याशिवाय एक अष्टपैलू दिसू शकतो असेही रोहितने नमूद केले.
आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित म्हणाला की, इथे नक्की काय घडते ते तुम्हाला दिसेलच. इथे फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आमच्याकडे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे फिरकीपटू आहेत. त्यामुळे संघ मजबूत बनवायचा असेल तर अष्टपैलू खेळाडूंची फळी हवी. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांचा कसा वापर करायचा यावर विचार सुरू आहे. या चार शिलेदारांवर मोठी जबाबदारी असेल. चारही जण एकत्र खेळू शकतात का? जास्त पर्याय असल्यास ते योग्य ठरते. बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात फिरकीपटूंनी २-२ षटके टाकली. फलंदाजी कशी वाढवता येईल यावरही विचार सुरू आहे.
दरम्यान, भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हे संघ अ गटात आहेत. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. अमेरिकेतील काही सराव सामने पावसामुळे धुवून निघाले. भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यावर देखील पावसाचे सावट असेल का अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. जर एखादा सामना रद्द झाल्यास त्याचा गुणतालिकेत मोठा प्रभाव पडू शकतो.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.
विश्वचषकातील भारताचे सामने -५ जून - भारत विरूद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क९ जून - भारत विरूद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क१२ जून - विरूद्ध अमेरिका, न्यूयॉर्क१५ जून - विरूद्ध कॅनडा, फ्लोरिडा