T20 World Cup 2021, AFG vs NZ: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज ज्या स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंडचा महत्त्वपूर्ण सामना खेळवला जात आहे. त्याच स्टेडियमच्या पिच क्युरेटरचा सामना सुरू होण्याआधीच संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामना सुरू होण्याच्या काही तास आधीच क्युरेटर मोहन सिंग यांचा मृत्यू झाला आहे. यूएईच्या क्रिकेट असोसिएशननंही याला दुजोरा दिला आहे.
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, यूएई क्रिकेट असोसिएशनकडून लवकरच या संपूर्ण प्रकरणी सविस्तर पत्रक जारी केलं जाणार आहे. मोहन सिंग यांचा मृत्यू आजचा सामना सुरू होण्याआधी झाला आहे आणि त्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मोहन सिंग यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी आता स्थानिक पोलीस करत आहेत. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांकडूनही अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.
मोहन सिंग हे अबुधाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमचे मुख्य क्युरेटर होते. मोहन सिंग हे मूळचे पंजाब येथील रहिवासी असून २००३ साली ते यूएईमध्ये स्थलांतरीत झाले होते. मोहन सिंग गेल्या अनेक वर्षांपासून यूएईमध्येच वास्तव्याला होते. त्यांनी बीसीसीआयचे माजी मुख्य क्युरेटर दलजीत सिंग यांच्यासोबत पंजाबच्या मोहाली येथील क्रिकेट स्टेडियममध्ये काम केलं आहे. मोहन सिंग यांच्या मृत्यूची माहिती मिळताच दलजीत सिंग यांनाही धक्का बसला आहे.