Join us  

T20 World Cup, AFG vs SCO : मुजीब उर रहमाननं विक्रम केला, अफगाणिस्ताननं १३० धावांनी स्कॉटलंडवर विजय मिळवला 

T20 World Cup, AFGHANISTAN V SCOTLAND Live Updates : अफगाणिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात स्कॉटलंड संघावर दणदणीत विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 10:28 PM

Open in App

T20 World Cup, AFGHANISTAN V SCOTLAND Live Updates : अफगाणिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात स्कॉटलंड संघावर दणदणीत विजय मिळवला. Round 1 मध्ये धक्कादायक निकालाची नोंद करणारा स्कॉटलंड कडवी झुंज देईल असे अपेक्षित होते, परंतु अफगाणिस्तानं त्यांची हवाच काढली. फलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर अफगाणिस्तानच्या Mujeeb Ur Rahman यानं विक्रमी कामगिरी केली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्ताननं २० षटकांत ४ बाद १९० धावा कुटल्या. हझरतुल्लाह झझाई व मोहम्मद शाहजाज यांनी अफगाणिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. शाहजाद २२ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रहमनुल्लाह गुर्बाज यानं झझाईला सॉलिड साथ दिली. झझाईनं ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४४ धावांवर माघारी गेला. गुर्बाजनं ३७ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४६ धावांवर बाद झाला. नजिबुल्लाह झाद्रान यानं वादळ आणलं. त्यानं ५ चौकार व ३ षटकार खेचून ३४ चेंडूंत ५९ धावा चोपल्या. कर्णधार मोहम्मद नबी ४ चेंडूंत ११ धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानच्या संघानं स्पर्धेत  एका डावात सर्वाधिक ११ षटकार खेचले.

प्रत्युत्तरात स्कॉटलंडचा संघ ६० धावांत तंबूत परतला. स्कॉटलंडचे पाच फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. मुजीब उर रहमाननं २० धावांत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डावात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. राशिद खाननं ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर नवीन उल हकनं १ बळी बाद केला. स्कॉटलंडचा संघ १०.२  षटकंच खेळू शकला.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१अफगाणिस्तान
Open in App