नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर या देशाच्या अस्तित्त्वावर संकट आले आहे. जागतिक स्तरावर अफगाणिस्तानच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त होत असताना, आता क्रिकेटविश्वातही अफगाणिस्तानचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे आणि यासाठी जबाबदार ठरणार ते तालिबान. अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डच्या उच्च पदाधिकाऱ्यांना हटविले, तसेच महिला क्रिकेटवरही बंदी आणली.
त्यातच, हा संघ आता तालिबानच्या ध्वजाखाली खेळणार असल्याचे वृत्त समोर येत असल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कठोर पावले उचलली आहेत. तालिबानने नसीबुल्लाह हक्कानीला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डच्या कार्यकारी निर्देशकपदी नियुक्त करताना हामीद शिनवारी यांची गच्छंती केली. त्यामुळेच अफगाणिस्तान संघ आता तालिबानच्या ध्वजाखाली खेळणार असल्याच्या वृत्तांना उधाण आले आहे.