Join us  

T20 World Cup: अफगाणिस्तानने मिळवला नामिबियावर सहज विजय

T20 World Cup: असगर अफगाणला दिला विजयी निरोप, गोलंदाजांची शानदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 11:33 AM

Open in App

अबुधाबी : अफगाणिस्तानने शानदार गोलंदाजी करत रविवारी येथे आयसीसी टी२० विश्वचषक सुपर १२ च्या सामन्यात ग्रुप दोनमध्ये नामिबियावर ६२ धावांनी विजय मिळवला आणि माजी कर्णधार असगर अफगाण याला विजयी निरोप दिला. गेल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झालेल्या अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडला पराभूत केले. हा त्यांचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. अफगाणिस्तानने चार गुण घेत दुसरे स्थान गाठले आहे, तर त्यांचा नेट रनरेट ३.०९७ आहे. स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या नामिबियाने गेल्या सामन्यात स्कॉटलंडवर विजय मिळवला होता.

अफगाणिस्तानने चांगली सुरुवात केली. मोहम्मद शहेजादच्या ४५ धावांच्या मदतीने पाच बाद १६० धावा केल्या. शहजादप्रमाणेच संघाकडून हरजतुल्लाह जजई याने ३३, कर्णधार मोहम्मद नबी याने नाबाद ३२ आणि अफगाण याने ३१ धावांची उपयुक्त खेळी केली आणि शानदार गोलंदाजी आक्रमण करत निर्धारित २० षटकांत नामिबियाला २० षटकांत ९ बाद ९८ धावाच दिल्या. नामिबियासाठी एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. त्यांच्यासाठी सर्वांत जास्त धावा डेविड विस (२६) याने केल्या. 

अफगाणिस्तानसाठी हामिद हसनने शानदार गोलंदाजी करताना चार षटकांत नऊ धावा देत तीन, तर नवीन उल हक याने २६ धावा देत तीन बळी घेतले. स्टार लेग स्पिनर राशिद खान याने एक बळी घेतला, तर गलबदन नईब याने एक षटक निर्धाव टाकले. अफगाणिस्तानच्या जजई (३३ धावा) आणि शहेजाद यांनी पॉवरप्लेमध्ये एकही बळी न गमावता ५० धावा करत सुरुवात केली. मात्र, पॉवरप्लेनंतर पहिल्याच षटकांत जजईला  स्मिट याने बाद केले. रहमनुल्हाह गुरबाज पायचीत झाला. शहजाद अर्धशतकाच्या दिशेने पुढे जात होता. मात्र, त्याला रुबेन ने बाद केले. 

त्याने ३३ चेंडूत ४५ धावा केल्या. असगर अफगाण हा ३१ धावांवर बाद झाला. तो जेव्हा तंबूत परत जात होता, तेव्हा त्याला अफगाण संघाच्या चाहत्यांनी सलामी दिली, तर खेळाडू आणि स्टाफने त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला आणि सामना संपल्यावर त्याला खेळाडूंनी खांद्यावर उचलून घेतले होते.

अफगाण झाला निवृत्त!अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण याने नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवाने अत्यंत दु:ख झाल्याचे सांगत अफगाणने हा निर्णय घेतला. ३३ वर्षीय अफगाणने एकूण ११५ सामन्यांत संघाचे नेतृत्व केले असून, त्याने सहा कसोटी, ११४ एकदिवसीय आणि ७५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या सर्वप्रकारांत मिळून त्याने ४,२४६ धावा केल्या आहेत.

अफगाणिस्तान :   २० षटकांत ५ बाद १६० धावा (मोहम्मद शाहझाद ४५, हझरतुल्लाह झझई ३३, मोहम्मद नबी नाबाद ३२; जॅन निकोल लॉफ्टी-इटोन २/२१, रुबेन ट्रम्पेलमन २/३४) वि. वि. नामिबिया : २० षटकांत ९ बाद ९८ धावा (डेव्हिड विसे २६; हमिद हसन ३/९, नवीन उल हक ३/२६.) 

टॅग्स :टी-20 क्रिकेटट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App