T20 World Cup : टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झिम्बाब्वेविरुद्ध पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याने 25 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी केली आणि त्यामुळेच भारतीय संघाने T20 विश्वचषक स्पर्धेतील अखेरची ग्रुप मॅच 71 धावांनी जिंकली. यानंतर एका पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटूनही अशा फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी जावं तरी कुठे असं वक्तव्य केले आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा भारताच्या मधल्या फळीला मिळालेला वरदान ठरतोय. मार्च 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त पदार्पण केल्यानंतर सूर्याने मागे वळूनच पाहिले नाही. एबी डिव्हिलियर्सननंतर 'Mr 360' अशी ओळख सूर्याला मिळतेय. पण, सूर्यकुमार हा आपल्यापेक्षाही सरस असल्याचे एबीने नुकतेच मान्य केले. ए स्पोर्ट्सवर सूर्यकुमारच्या जबरदस्त शॉटचा रिप्ले दाखवताच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने भारताच्या स्टार फलंदाजाचे कौतुक केले. तसंच तो परग्रहावरून आला आहे असे वाटत असल्याचेही त्याने सांगितले.
“मला असे वाटतेय की तो परग्रहावरून आला आहे. तो कोणत्याही व्यक्तीपेक्षा निराळा आहे. त्याने जितक्या धावा केल्या आहेत, त्या केवळ झिम्बाब्वेच्या विरोधात नाही. त्या जगातील सर्वोत्त्कृष्ठ गोलंदाजांविरोधात आहेत आणि त्या पाहण्यासारख्या आहेत,” असे वसीम अक्रमने म्हटले. तर दुसकीकडे वकार युनिसनेही त्याच्या फलंदाजीचं कौतुक केलं. तसंच फलंदाजाने आता जावे कुठे, अशा फलंदाजाविरोधात प्लॅन आखणे कठिण असल्याचेही त्यांने सांगितले.
… तेव्हा योजना आखू शकता"त्याला टी-20 मध्ये बाद करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? म्हणजे एकदिवसीय आणि कसोटीमध्ये तुम्ही योजना आखून त्याला आऊट करू शकता. परंतु टी-20 मध्ये तसंही गोलंदाज बॅकफूटवर असतो आणि जेव्हा कोणी अशा फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याच्याविरोधात गोलंदाजी करणे खूप कठीण असते. मला वाटते की गेल्या सामन्यात पाकिस्तानने त्याच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्याला शॉर्ट बॉल्स टाकले होते. कदाचित तोच एकमेव मार्ग असेल," असेही त्याने म्हटले.