T20 World Cup, AUSTRALIA V ENGLAND : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्या सामन्याची उत्सुकता होती ती इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीची. इंग्लंडनं नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिलं. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला दुःखद वार्ता मिळाली. ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज खेळाडू अॅश्ली मॅलेट आणि अॅलेन डेव्हिडसन ( Ashley Mallett and Alan Davidson) यांचे निधन झाले. त्यांना श्रंद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दंडावर काळी फित बांधली होती. हे दुःख असताना मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही निराशाजन झाली. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस व ग्लेन मॅक्सवेल हे चार खेळाडू २१ धावांवर माघारी परतले.
मॅलेट यांनी १९६८मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. त्यांनी ३८ कसोटींत १३२ विकेट्स घेतल्या. १९८०मध्ये त्यांनी अखेरची कसोटी खेळली होती. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ऑफ स्पिनर्समध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नॅथन लियॉन ( ३९९) आणि ह्यू ट्रंबल ( १४१) हे अव्वल दोन क्रमांकावर आहेत. १९६९-७०मध्ये बिल लॉरी यांच्या नेतृत्वाखालील ऑसी संघांनं भारतावर ३-१ असा विजय मिळवला होता आणि त्या मालिकेत मॅलेट यांची महत्त्वाची भूमिका होती त्यांनी २८ विकेट्स घेतल्या होत्या.