T20 World Cup, Australia vs New Zealand Live : सुपर १२ च्या मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली आणि यजमान ऑस्ट्रेलियासमोर शेजारी न्यूझीलंडचे आव्हान आहे. पण, २०११पासून क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील संघाचे पारडे जड आहे. सराव सामन्यांत दोन्ही संघांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला जागा मिळालेली नाही, तर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रोहित व विराटला चॅलेंज देणारा फलंदाज मार्टीन गुप्तील याला किवींनी बाकावर बसवले आहे.
- न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, फिन अॅलन, केन विलियम्सन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅम्पमन, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, इश सोढी, ल्युकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
- ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड
फिन अॅलन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी किवींच्या डावाची सुरुवात केली आणि अॅलनने पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कला चोपून काढले. तिसऱ्या चेंडूवर डाव्या बाजूला अॅलनने खेचलेला षटकार पाहण्यासारखा होता. मागील वर्षभरात जलदगती गोलंदाजांमध्ये सर्वाधिक २३ विकेट्स घेणाऱ्या जोश हेझलवूडचे स्वागत कॉनवेने चौकाराने केले. त्यानंतर अॅलनने दोन चौकार खेचले. तिसऱ्या षटकात अॅलनचा झेल अॅजम झम्पाकडून सुटला... हा झेल जरा अवघडच होता. पॅट कमिन्सच्या त्या षटकात अॅलनने १७ धावा चोपल्या. चौथ्या षटकात ऑसींना मार्कस स्टॉयनिसला बोलवावे लागले.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या फिन अॅलनची ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे आणि त्याने त्याची निवड सार्थ ठरवली. मार्टीन गुप्तीलच्या जागी त्याला का खेळवले याचे उत्तर त्याने खेळातूनच दिले. १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत अॅलनने ४६९ धावा केल्या आहेत. पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाला हे वादळ रोखण्यात यश आलं. फिन १६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर जोश हेझलवूडच्या यॉर्करवर त्रिफळाचीत झाला.
वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सहा षटकांत १०+ चेंडूंचा सामना करून सर्वाधिक स्ट्राईक रेटचा विक्रम फिनने नाववर केला. २००९मध्ये आरोन रेडमंडने आयर्लंडविरुद्ध १८ चेंडूंत ४०* धावा केलेल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट २२२.२ इतका होता. न्यूझीलंडने पहिल्या सहा षटकांत 1 बाद 69 धावा केल्या आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवर प्लेमधील किवींची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"