T20 World Cup, Australia vs New Zealand Live : न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला जागा दाखवली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय घातकी ठरला. अनुभवी फलंदाज मार्टीन गुप्तील याला बाकावर बसवून किवींनी संधी दिलेल्या २३ वर्षीय फिन अॅलनने स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानंतर डेव्हॉन कॉनवेने मोर्चा सांभाळला. केन विलियम्सन व जिमि निशॅम यांच्यासह दमदार भागीदारी करून त्याने ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान उभे केले.
फिन अॅलन व डेव्हॉन कॉनवे यांनी किवींच्या डावाची सुरुवात केली. अॅलनने पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कला चोपून काढले. तिसऱ्या चेंडूवर डाव्या बाजूला अॅलनने खेचलेला षटकार पाहण्यासारखा होता. जोश हेझलवूडचे स्वागत कॉनवेने चौकाराने केले. त्यानंतर अॅलनने दोन चौकार खेचले. तिसऱ्या षटकात अॅलनचा झेल अॅजम झम्पाकडून सुटला... हा झेल जरा अवघडच होता. पॅट कमिन्सच्या त्या षटकात अॅलनने १७ धावा चोपल्या. पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाला हे वादळ रोखण्यात यश आलं. फिन १६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर जोश हेझलवूडच्या यॉर्करवर त्रिफळाचीत झाला. न्यूझीलंडने पहिल्या सहा षटकांत १ बाद ६९ धावा केल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवर प्लेमधील किवींची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
कॉनवे व केन विलियम्सन यांनी धावांचा वेग कायम राखताना १० षटकांत संघाला ९७ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ४० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कॉनवेने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली आणि ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कॉनवे व केन ( २३) यांची ५२ चेंडूंवरील ६९ धावांची भागीदारी झम्पाने संपुष्टात आणली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००+ धावा करणाऱ्या फलंदाजांत कॉनवेने दुसरे स्थान पटकावले. डेव्हिड मलान ( २४ डाव) अव्वल स्थानावर आहे. कॉनवेने ( २६ डाव) आज बाबर आजम (२६) व विराट कोहली ( २७) यांचा विक्रम मोडला. जिमी निशॅमने कॉनवेला चांगली साथ दिली. कॉनवे ५८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. निशॅमने १३ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद २६ धावा करताना किवींनी ३ बाद २०० धावांचा मोठा पल्ला गाठून दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"