T20 World Cup, Australia vs New Zealand Live : डार्कहॉर्स न्यूझीलंडने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मागील ११ वर्षांत ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याच फॉरमॅटमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या न्यूझीलंडने आज बाजी उलटली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडने सांघिक खेळ करताना यजमान ऑस्ट्रेलियाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. डेव्हॉन कॉनवे व फिन अॅलन यांच्या दमदार फटकेबाजीनंतर मिचेल सँटनर, टीम साऊदी व इश सोढी यांनी गोलंदाजीत कमाल करून दणदणीत विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडचा SuperMan! ग्लेन फिलिप्सचा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ६८ धावांत तंबूत
२३ वर्षीय फिन अॅलनने स्फोटक सुरुवात करून दिली. त्याने १६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा केल्या. त्यानंतर कॉनवेने मोर्चा सांभाळला आणि केन विलियम्सन व जिमी निशॅम यांच्यासह त्याने दमदार भागीदारी करून ऑस्ट्रेलियासमोर २०१ धावांचे तगडे आव्हान उभे केले. कॉनवे व केन विलियम्सन ( २३) यांनी ६९ धावांची भागीदारी केली. जिमी निशॅमने कॉनवेला चांगली साथ दिली. कॉनवे ५८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. निशॅमने १३ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद २६ धावा करताना किवींनी ३ बाद २०० धावांचा मोठा पल्ला गाठून दिला. निशॅम व कॉवने यांनी २४ चेंडूंत नाबाद ४८ धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्सनेही कॉनवेसह १८ चेंडूंत २७ धावा जोडल्या. जोश हेझलवूडने ४१ धावांत २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात दुसऱ्या स्लिपमध्ये जीवदान मिळालेला डेव्हिड वॉर्नर ( ५) दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर वित्रिच पद्धतीने त्रिफळाचीत झाला. टीम साऊदीची ही ट्वेंटी-२०मधील १२३ वी विकेट ठरली आणि त्याने सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शाकिब अल हसनचा ( १२२ ) विक्रम मोडला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला धक्के बसत राहिले. अॅरोन फिंच ( १३), मिचेल मार्श ( १६), मार्कस स्टॉयनिस ( ७) व टीम डेव्हिड ( ११) हे मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. मिचेल सँटनरने अप्रतिम गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांची कॅचिंग प्रॅक्टीस सुरू होती. स्टॉयनिसचा ग्लेन फिलिप्सने घेतलेला झेल पाहण्यासाऱखा होता. ऑसींचा निम्मा संघ ६८ धावांत माघारी परतला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"