T20 World Cup, Australia vs New Zealand Live : २०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या यजमानांना दुसऱ्याच षटकात धक्का बसला. डेव्हिड वॉर्नरची काहीच चूक नसताना त्याला विचित्र पद्धतीने बाद होऊन माघारी जावे लागले. टीम साऊदीने न्यूझीलंडला हे यश मिळवून दिले. अॅरोन फिंच व मिचेल मार्श यांनी काही सुरेख फटके मारले, परंतु मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर केन विलियम्सनने सुरेख झेल घेताना फिंचला ( १३) माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाला ३० धावांवर दुसरा धक्का बसला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय घातकी ठरला. अनुभवी फलंदाज मार्टीन गुप्तील याला बाकावर बसवून न्यूझीलंडने संधी दिलेल्या २३ वर्षीय फिन अॅलनने स्फोटक सुरुवात करून दिली. डेव्हॉन कॉनवेने मोर्चा सांभाळला. केन विलियम्सन व जिमि निशॅम यांच्यासह दमदार भागीदारी करून ऑस्ट्रेलियासमोर २०१ धावांचे तगडे आव्हान उभे केले. अॅलन व कॉनवे यांनी किवींच्या डावाची सुरुवात केली. अॅलनने पहिल्या षटकापासून आक्रमक खेळ सुरू केला. त्याने १६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्या सहा षटकांत १ बाद ६९ धावा केल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवर प्लेमधील किवींची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
कॉनवे व केन विलियम्सन यांनी ४० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कॉनवेने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली आणि ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कॉनवे व केन ( २३) यांची ५२ चेंडूंवरील ६९ धावांची भागीदारी झम्पाने संपुष्टात आणली. जिमी निशॅमने कॉनवेला चांगली साथ दिली. कॉनवे ५८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. निशॅमने १३ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद २६ धावा करताना किवींनी ३ बाद २०० धावांचा मोठा पल्ला गाठून दिला. निशॅम व कॉवने यांनी २४ चेंडूंत नाबाद ४८ धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्सनेही कॉनवेसह १८ चेंडूंत २७ धावा जोडल्या. जोश हेझलवूडने ४१ धावांत २ विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स ( ४६) महागडा गोलंदाज ठरला.
प्रत्युत्तरात दुसऱ्या स्लिपमध्ये जीवदान मिळालेला डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर वित्रिच पद्धतीने त्रिफळाचीत झाला. टीम साऊदीने टाकलेल्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चेंडू वॉर्नरच्या बॅटला लागून पॅडवर आदळला, नंतर पुन्हा तो बॅटला लागून स्टम्प्सवर पडला अन् ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. टीम साऊदीची ही ट्वेंटी-२०मधील १२३ वी विकेट ठरली आणि त्याने सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शाकिब अल हसनचा ( १२२ ) विक्रम मोडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"