T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला हादरवून टाकले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, परंतु ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला दणदणीत विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून दारूण पराभव पत्करावा लागलेल्या ऑसींनी आज घरच्या चाहत्यांना खूश केले. मॅक्सवेल १२ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतल्यानंतर स्टॉयनिसचे वादळ घोंगावले आणि त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली.
ग्लेन मॅक्सवेलच्या मानेवर चेंडू वेगाने आदळला, वेदनेने कळवळत जमिनीवर झोपला, Video
कुसल मेंडिस ( ५) माघारी परतल्यानंतर पथूम निसंका आणि धनंजया डी सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. धनंजयाला २६ धावांवर बाद करून अॅगरने मोठं यश मिळवून दिलं आणि त्यानंतर निसंकाही ( ४०) रन आऊट झाला. भानुका राजपक्षा ( ७), वनिंदू हसरंगा ( १) व दासून शनाका ( ३) हेही झटपट माघारी परतले. श्रीलंकेने ३६ धावांत ४ विकेट्स गमावल्या आणि ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. चरिथ असलंका व चमिका करुणारत्ने यांनी अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले आणि संघाला ६ बाद १५७ धावांपर्यंत पोहोचवले. असलंका ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला.
डेव्हिड वॉर्नर ( ११) लगेच माघारी परतला. अॅरोन फिंच व मिचेल मार्शवर जबाबदारी होती, परंतु मार्श ( १८) अपयशी ठरला. श्रीलंकेने गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात दमदार कामगिरी करताना यजमानांवर दडपण निर्माण केले होते. पॉवर प्लेमध्ये ऑसींना एकही चौकार मारता आला नाही आणि ट्वेंटी-२० असे प्रथमच घडले. मात्र, याची भरपाई ग्लेन मॅक्सवेलने १०व्या षटकात केली. वनिंदूच्या त्या षटकात ( २ षटकार व १ चौकार) मॅक्सवेलने १९ धावा चोपल्या. १२व्या षटकात लाहिरू कुमाराच्या चेंडूवर मॅक्सवेलच्या हाताला ईजा झाली. तिसरा चेंडू मॅक्सवेलच्या मानेवर आदळला अन् फलंदाज हेल्मेट काढून जमिनिवर लोळला... प्राथमिक उपचार घेऊन तो पुन्हा उभा राहिला. चमिका करुणारत्नेच्या षटकात फिंचचा झेल सुटला अन् दुसऱ्याच चेंडूवर मॅक्सवेलने मारलेला खणखणीत चेंडू सीमारेषेवर आशेन बंदाराने सुरेखरित्या टिपला.मॅक्सवेल गेल्यानंतर ऑसींवर दडपण येईल असे वाटले होते, परंतु मार्कस स्टॉयनिसने १५व्या षटकात वनिंदूला १९ धावा चोपल्या. थिक्सानालाही त्याने नाही सोडले आणि तीन षटकार खेचून १७ चेंडूंत ( ४ चौकार व ५ षटकार) अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२०तील हे जलद अर्धशतक ठरले. त्याच्या या फटकेबाजीने श्रीलंकेच्या हातून सामना ऑसींच्या बाजूने अलगद झुकला. फिंच विकेट टिकवून संयमी खेळी करत होता. स्टॉयनिस १८ चेंडूंत ५९ धावांवर नाबाद राहिला, तर फिंचने नाबाद ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स राखून सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"