T20 World Cup, Australia vs England : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आलेले नाही. वेस्ट इंडिजने सर्वाधिक दोन जेतेपदं पटकावली, परंतु ती सलग नव्हती. हा इतिहास बदलू पाहण्याचा ऑस्ट्रेलियाचा मनसूबा होता, परंतु त्यांच्याच घरी पावसाने त्यांचीच धुलाई केली. न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ग्रुप १च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून शर्यतीत स्वतःला कायम राखले. आज इंग्लंडविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र पावसाने घात केला.
मेलबर्नवर आज दोन सामने होणार होते. त्यापैकी एक सामना आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. पावसाच्या तुफान बॅटींगमुळे ही वेळ आली आणि दोन्ही संघांना १-१ गुण दिला गेला. अफगाणिस्तानचा दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती. आयर्लंडवर पावसाची कृपा झालेली दिसतेय... इंग्लंडविरुद्धचा सामना त्यांनी ५ धावांनी डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ( DLS) जिंकला. आजचा सामना रद्द झाल्यानंतर आयर्लंडने ३ गुणांसह ग्रुप १ मध्ये दुसरे स्थान पटकावले आहे, तर अफगाणिस्तान २ गुणांसह तळावर आहे.
आयर्लंड-अफगाणिस्तान सामना रद्द झाल्यानंतर मेलबर्नवरच होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-इंग्लड लढतीवर टांगती तलवार होतीच. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणारा हा सामना पावसामुळे लांबणीवर पडला. ३ वाजता अम्पायर्सकडून खेळपट्टीची पाहणी केली गेली अन् सामना आता तरी सुरू होईल असे वाटत असताना पुन्हा पाऊस पडला. अखेर हाही सामना रद्द करावा लागला आणि १-१ गुणाचे विभाजन झाले.
ग्रुप १ ची सद्यस्थितीन्यूझीलंड, इंग्लंड व आयर्लंड यांच्या खात्यात प्रत्येकी ३ गुण झाले आहेत. पण, न्यूझीलंडचे दोनच सामने झालेत, तर आयर्लंड व इंग्लंड प्रत्येकी ३ सामने झाले. ऑस्ट्रेलियाही ३ सामन्यांत ३ गुणांसह टॉप फोअरमध्ये आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण आहेत.
न्यूझीलंड ( वि. श्रीलंका, इंग्लंड व आयर्लंड) आणि श्रीलंका ( वि. न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड) यांचे प्रत्येकी ३ सामने अजूनही शिल्लक आहेत. अशात न्यूझीलंड ग्रुप १ मधून उपांत्य फेरीत जाण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला उर्वरित दोन सामन्यांत आयर्लंड व अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे आणि या दोन्ही लढती जिंकून तेही शर्यतीत राहू शकतात.
इंग्लंड ( वि. न्यूझीलंड, श्रीलंका), आयर्लंड ( वि. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड), अफगाणिस्तान ( वि. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया) यांनाही यजमानांइतकीच समान संधी आहे. त्यामुळे पाऊस आणि सामन्यांचे निकाल यावर गतविजेत्यांचे आव्हान अवलंबून आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"