T20 World Cup, BANGLADESH V NETHERLANDS : बांगलादेशने सुपर १२च्या सामन्यात नेदरलँड्सवर विजय मिळवला. ऑरेंज आर्मीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना बांगलादेशला १४४ धावांवर रोखले. पण, नेदरलँड्सच्या फलंदाजांना अपयश आले. तस्कीन अहमदने २५ धावा देत ४ विकेट्स घेत विजयात मोठा वाटा उचलला. नेदरलँड्सच्या कॉलिन एकरमनने अर्धशतक झळकावताना बांगलादेशच्या पोटात गोळा आणला होता, परंतु अनुभवाच्या जोरावर ते सरस ठरले. बांगलादेशचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच विजय ठरला.
राऊंड १ मधून सुपर १२ मध्ये एन्ट्री घेणाऱ्या नेदरलँड्सने पहिल्याच सामन्यात तगड्या बांगलादेशला हिस्का दाखवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांना त्यांनी जखडून ठेवले. नेदरलँड्सच्या गोलंदाजाचे आज कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पॉल व्हॅन मिकेरेन ( २-२१) व बॅस डे लीड ( २-२९) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलीच, शिवाय त्यांना फ्रेड क्लासेन, टीम प्रिंगल, शरिज अहमद, लोगान व्हॅन बीक यांनी प्रत्येकी एक विकेट घेत उत्तम साथ दिली. बांगलादेशच्या अफिफ होसैनने सर्वाधिक ३८ धावा केल्या, तर नजमुल होसैन शांतो ( २५) व मुसाडेक होसैन ( २०*) यांनीही योगदान देत ८ बाद १४४ धावा केल्या.
नेदरलँड्सच्या फलंदाजांनाही अपयश आले. तस्कीन अहमदने पहिल्याच षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. विक्रम सिंग (०) व बॅस डी लीड ( ०) हे गोल्डन डकवर माघारी परतल्यानंतर मॅक्स ओ'डाऊड ( ८) व टॉम कूपर ( ०) हे रन आऊट झाले. नेदरलँड्सचे ४ फलंदाज १५ धावांवर माघारी परतले. कॉलिन एकरमनने अर्धशतकी खेळी करून नेदरलँड्सची खिंड लढवली होती. स्कॉट एडवर्ड्स ( १६) वगळल्यास त्याला अन्य फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. तस्कीनने आणखी दो विकेट्स घेतल्या. त्यात हसन महमुदने दोन विकेट व शाकिब अल हसनने एक विकेट घेत नेदरलँड्सची अवस्था ९ बाद १०१ अशी केली. फ्रेड क्लासेन ( ७) व पॉल व्हॅन मीकेरेन ( २४) यांनी अखेरपर्यंत खिंड लढवली, परंतु ९ धावा कमी पडल्या. नेदरलँड्सला १३५ धावा करता आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"