T20 World Cup, BANGLADESH V SCOTLAND : बांगलादेशनं Round 1 च्या पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडच्या धावांना लगाम लावली. स्कॉटलंडच्या ख्रिस ग्रेव्हेस आणि मार्क वॅट वगळता अन्य फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. तरीही स्कॉटलंडनं ६ बाद ५३ धावा अशा अवस्थेतून सन्मानजनक धावसंख्या उभारली. या सामन्यात शाकिब अल हसननं ( Shakib Al Hasan ) दोन विकेट्स घेत मोठ्या पराक्रम केला. त्यानं श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा याचा भारी विक्रम मोडला.
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीला बोलावलं. कायले कोएत्झर ( ०), मॅथ्यू क्रॉस ( ११), रिची बरींग्टन ( २), कॅलम मॅकलीओड ( ५), मिचेल लिस्क ( ०) व सलामीवीर जॉर्ज मुन्सी ( २९) हे धावफलकावर ५३ धावा असताना माघारी परतले. या सहा विकेट्समध्ये मेहदी हसननं ( ३-१९) आणि शाकिब अल हसननं ( २-१७) मिळून पाच विकेट्स घेतल्या. ख्रिस ग्रेव्हेस आणि मार्क वॅट यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून स्कॉटलंडला शतकी पल्ला पार करून दिला. वॅट २२ धावांवर माघारी परतला, परंतु ग्रेव्हेसनं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्कॉटलंडनं २० षटकांत ९ बाद १४० धावा उभ्या केल्या.
शाकिब अल हसनचा मोठा विक्रमशाकिबनं आजच्या सामन्यात दोन विकेट्स घेताच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. त्यानं श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचा १०७ विकेट्सचा विक्रम मोडला. शाकिबनं ८९ सामन्यांत १०८ विकेट्स घेतल्या आहेत.