ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी पाकिस्ताला एकामागून एक धक्के बसत आहेत. यूएईत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करताच तासाभरात मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी राजीनामे दिले. कर्णधार बाबर आझम या संघावर नाखुश असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) अध्यक्षपदावर रमीझ राजा यांची नियुक्ती झाली अन् पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघाचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या. त्यात PCBचे सीईओ वसीम खान यांनीही आज राजीनामा दिला. आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचा मुख्य खेळाडू मोहम्मद हाफिज हा वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी कर्णधार हाफिज याला डेंग्यू झाला असून त्यानं नॅशनल ट्वेंटी-२० अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता तो आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतूनही माघार घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील महिन्यात हाफिज ४१ वर्षांचा होईल आणि सध्या त्याच्यावर लाहोर येथे घरीच उपचार सुरू आहेत. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी फिटनेस सिद्ध करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.
''डेंग्यू व्हायरसमुळे शरिरावर किती परिणाम होतो, यावर पुढील सर्व अवलंबून आहे. डेंग्यूमुळे थकवा येतो आणि अशक्यपणा जाणवतो. त्यातून पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी किमान एक महिना लागतो,''असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. PCBमधील खात्रीदायक सूत्रांच्या माहितीनुसार हाफिजच्या प्रकृतीवर बोर्ड लक्ष ठेऊन आहेत आणि तो तंदुरुस्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ १४ ऑक्टोबरला यूएईत दाखल होण्याची शक्यता आहे.