दुबई : ‘न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळविण्यात आले. यातून हाच इशारा मिळत आहे की, ट्रेंट बोल्टचा इनस्विंग माऱ्याचा सामना करण्यास संघ व्यवस्थापनाचा रोहित शर्मावर विश्वास नव्हता,’ असे म्हणत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनावर टीका केली.
डावाच्या सुरुवातीला आत येणाऱ्या चेंडूवर खेळताना रोहित अडखळताना दिसला. पाकविरुद्धही तो असाच अडखळला. इशान किशनला सलामीला पाठविण्याचा भारतीय संघाचा प्रयोगही फसला. गावसकर यांनी सांगितले की, ‘इशान किशन ‘मार किंवा मर’ अशा पद्धतीचा खेळाडू आहे. त्याच्यासारख्या फलंदाजाने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळावे. तो त्या क्रमांकावर सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळू शकतो. आता जणू डावखुऱ्या बोल्टचा सामना करण्यास आमचा तुझ्यावर विश्वास नाही, असेच संघ व्यवस्थापनाने रोहितला सांगितले असावे असे दिसते.’
गावसकर पुढे म्हणाले की, ‘जर एखाद्या खेळाडू मोठ्या कालावधीपासून एका क्रमांकावर खेळत असेल आणि अचानक त्याला त्या स्थानावरून उचलून दुसऱ्या क्रमांकावर खेळण्यास सांगितले, तर त्या खेळाडूलाही आपल्या क्षमतेवर शंका निर्माण होईल. जर किशनने ७०च्या आसपास धावा केल्या असत्या, तर त्याचे कौतुक झाले असते, पण आता तो अपयशी ठरल्याने त्या निर्णयावर टीका होत आहे.’
भारतीय संघाने अपयशाच्या भीतीने फलंदाजी क्रम बदलण्याचा निर्णय घेतला का, हे मला माहीत नाही. पण त्यांनी फलंदाजी क्रमवारीत जे काही बदल केले, ते यशस्वी ठरले नाही. रोहित इतका शानदार फलंदाज आहे आणि त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. तिसऱ्या क्रमांकावर अत्यंत यशस्वी ठरलेला कोहली स्वत: चौथ्या स्थानी आला. किशनसारख्या युवा खेळाडूला डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
- सुनील गावसकर